अल खुर्शीद उर्दू हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी अनिबा अनिस शेखचे NEET 2026 मध्ये घवघवीत यश - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Friday, July 17, 2026

अल खुर्शीद उर्दू हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी अनिबा अनिस शेखचे NEET 2026 मध्ये घवघवीत यश

अल खुर्शीद उर्दू हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी अनिबा अनिस शेखचे NEET 2026 मध्ये घवघवीत यश

दिग्रस, प्रतिनिधी : येथील अल खुर्शीद उर्दू हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी कु. अनिबा अनिस शेख हिने NEET 2026 परीक्षेत 720 पैकी 588 गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे शाळा, पालक, शिक्षक आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे.

अनिबाच्या यशाबद्दल शाळेत विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अनिबा व तिच्या पालकांना विशेष निमंत्रित करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अनिबा व तिच्या कुटुंबीयांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुरआन पठणाने झाली. प्रास्ताविकात जुनेद सर यांनी अनिबाच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत तिच्या जिद्दी, सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीचे कौतुक केले.

यावेळी अतीक शेख सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, "यशाची खरी गुरुकिल्ली म्हणजे सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम," असे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना आजपासूनच स्पर्धा परीक्षांसाठी नियोजनबद्ध तयारी करण्याचे आवाहन केले.

अनिबाचे आजोबा शेख रहीम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नियमित अभ्यास, शिस्त आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे कोणतेही ध्येय गाठता येते, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी शाळेतील शिक्षकांच्या समर्पित कार्याचे विशेष कौतुक केले.

आपल्या मनोगतात कु. अनिबा अनिस शेख हिने सर्वप्रथम अल्लाहचे आभार मानत आपल्या यशाचे श्रेय पालक, शिक्षक आणि कुटुंबीयांना दिले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ती म्हणाली, "दहावीपर्यंत विज्ञान आणि गणिताच्या मूलभूत संकल्पना भक्कम करा. त्या स्पष्ट असतील तर NEET चा अभ्यास समजणे सोपे जाते आणि यशाचा मार्ग अधिक सुकर होतो.उर्दू माध्यमातील विद्यार्थीदेखील योग्य नियोजन, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर NEET सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात.

तिने पुढे सांगितले की, "उर्दू माध्यमातील विद्यार्थीदेखील योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर NEET सारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकतात. माध्यम कधीच अडथळा नसतो; आत्मविश्वास आणि चिकाटी हीच यशाची खरी ताकद आहे."

शाळेचे मुख्याध्यापक खालिद अहमद सर यांनी अनिबाचे अभिनंदन करून तिच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेतील महिला शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला. मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, महिला शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अनिबा तसेच तिचे आजोबा यांचाही सन्मान केला.

विश्वहितैशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव श्रीमती माहलका नजनीन शेख तसेच संस्थेच्या सर्व सदस्यांनी अनिबा आणि तिच्या कुटुंबीयांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या सत्कार समारंभाचे नियोजन जकी उल्लाह खान सर आणि अफरोज खान सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, महिला शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी अनिबाच्या यशातून प्रेरणा घेत अधिक मेहनतीने अभ्यास करून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्याचा संकल्प व्यक्त केला. अनिबाच्या या उल्लेखनीय यशामुळे उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांमध्ये नव्या आत्मविश्वासाची आणि आशेची ज्योत प्रज्वलित झाली असून, योग्य मार्गदर्शन, सातत्य आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हा प्रेरणादायी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu