स्मार्ट मीटरविरोधात ढाणकी कडकडीत बंद; व्यापारी, नागरिकांचा एकमुखी एल्गार
'स्मार्ट मीटर हटवा, सर्वसामान्यांना वाचवा'च्या घोषणांनी शहर दणाणले; निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
महागाव ता. प्रतिनिधी : शेख नुर शेख हैदर
महावितरण कंपनीकडून राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर योजनेच्या विरोधात शुक्रवारी ढाणकी शहरात नागरिकांचा तीव्र संताप पाहायला मिळाला. स्मार्ट मीटर बसविण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारी, शेतकरी, युवक, महिला तसेच विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत कडकडीत बंद पाळला. सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत शहरातील सर्व प्रमुख व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. ढाणकी व्यापारी महासंघाने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिल्याने बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाटाचे चित्र दिसून आले.
या आंदोलनाचे विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा किंवा पक्षीय हस्तक्षेप नव्हता. सर्व स्तरातील नागरिक एकत्र येऊन स्मार्ट मीटर योजनेविरोधात एकमुखाने आवाज उठवत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातून काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
मोर्चादरम्यान "स्मार्ट मीटर हटवा, सर्वसामान्यांना वाचवा", "जनविरोधी निर्णय रद्द करा", "स्मार्ट मीटर नकोत" अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होण्याची शक्यता असून त्याचा थेट आर्थिक फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार असल्याची भीती आंदोलकांनी व्यक्त केली. आधीच वाढत्या महागाईमुळे नागरिक त्रस्त असताना स्मार्ट मीटर योजना जनतेवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणारी ठरेल, असा आरोपही करण्यात आला.
यावेळी आंदोलकांच्या वतीने शासन व महावितरण प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला की, स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय तातडीने मागे घेण्यात आला नाही, तर यापेक्षाही व्यापक आणि तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल. ढाणकी बंदला व्यापारी, नागरिक, शेतकरी, युवक तसेच विविध सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने स्मार्ट मीटरविरोधातील जनआक्रोश पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला.


No comments:
Post a Comment