मोटर पंप केबल चोरी व धान्य चोरी प्रकरणी दोन टोळ्यांचा पर्दाफाश; सुमारे 8.43 लाखांचा मुद्देमाल जप्त - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Tuesday, June 2, 2026

मोटर पंप केबल चोरी व धान्य चोरी प्रकरणी दोन टोळ्यांचा पर्दाफाश; सुमारे 8.43 लाखांचा मुद्देमाल जप्त

मोटर पंप केबल चोरी व धान्य चोरी प्रकरणी दोन टोळ्यांचा पर्दाफाश; सुमारे 8.43 लाखांचा मुद्देमाल जप्त

दारव्हा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज संयुक्त कारवाई; 13 आरोपी जेरबंद, अनेक गुन्ह्यांची उकल

यवतमाळ : जिल्ह्यातील दारव्हा पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने दोन वेगवेगळ्या चोरीच्या प्रकरणांचा यशस्वी छडा लावत मोठी कारवाई केली आहे. मोटार पंपाच्या केबल चोरी करणाऱ्या टोळीला तसेच धान्य चोरी करणाऱ्या टोळीला अटक करून पोलिसांनी एकूण 8 लाख 43 हजार 654 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

पहिल्या प्रकरणात, घनापूर शिवारातील शेतातून मोटार पंपाच्या केबल चोरीच्या तक्रारीनंतर दारव्हा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी केबल चोरीची कबुली दिली. या प्रकरणात पोलिसांनी 475 फूट केबल, एक चारचाकी वाहन, एक मोटारसायकल, दोन मोबाईल फोन व कटर असा एकूण 5 लाख 69 हजार 154 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ईश्वर विलास चव्हाण, महादेव जांनेश्वर पवार, विक्की जांनेश्वर पवार, संदीप वसंत पवार, दामू रामकृष्ण पवार, पवन लक्ष्मण पवार आणि विकास आसाराम भोसले यांना अटक करण्यात आली.

दरम्यान, दुसऱ्या प्रकरणात तरसोळी येथील ग्रामपंचायत सभागृहातील खोलीत साठवून ठेवलेल्या तुरीच्या पोत्यांची चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. चौकशीत आरोपींनी तुरीची चोरी केल्याची कबुली देत इतर गावांमधील मोटार पंप व केबल चोरीच्या गुन्ह्यांचीही माहिती दिली. या प्रकरणात पोलिसांनी 26 तुरीची पोती, चोरीसाठी वापरलेले चारचाकी वाहन आणि ऑटो असा 2 लाख 74 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच चोरीचा माल विक्री करून मिळालेली 44 हजार 500 रुपयांची रोकड देखील जप्त करण्यात आली.

या प्रकरणातील आरोपी अमित पंजावराव बर्डे, रवी श्रीकृष्ण बर्डे, रोशन बबनराव जामनिक, निखिल मधुकर बर्डे, रत्नदीप विनोद बर्डे आणि विक्की संतोष बोने यांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान या आरोपींकडून भोपापूर, रामगाव, रामेश्वर तसेच बरबडी शिवारातील मोटार पंप व केबल चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली.

दोन्ही कारवायांमुळे दारव्हा तालुक्यातील चोरीच्या मालिकेला मोठा आळा बसला असून, पोलिसांनी एकूण 13 आरोपींना अटक करून 8 लाख 43 हजार 654 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या यशस्वी कारवाईमुळे अनेक प्रलंबित गुन्ह्यांची उकल झाली असून आणखी काही गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धार्थ भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दारव्हा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu