वीज चोरी मोहिमेच्या नावाखाली अल्पसंख्याकांना टार्गेट? यवतमाळात महावितरणविरोधात संतापाची लाट - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Wednesday, May 20, 2026

वीज चोरी मोहिमेच्या नावाखाली अल्पसंख्याकांना टार्गेट? यवतमाळात महावितरणविरोधात संतापाची लाट

वीज चोरी मोहिमेच्या नावाखाली अल्पसंख्याकांना टार्गेट? यवतमाळात महावितरणविरोधात संतापाची लाट


यवतमाळ : यवतमाळ शहरात सध्या महावितरणकडून सुरू असलेल्या वीज चोरी पाहणी मोहिमेवरून मोठा वाद निर्माण झाला असून अल्पसंख्याक बहुल भागांमध्ये सुरू असलेल्या कारवाईवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरातील पांढरकवडा रोड परिसरातील कोहिनूर सोसायटी, बिलाल कॉलोनी, शर्मा लेआउट तसेच जुना नागपूर रोड परिसरातील पोबारू लेआउट, चमेडिया लेआउट या भागांमध्ये महावितरणची तब्बल दहा ते पंधरा पथके सकाळपासून रात्रीपर्यंत घरोघरी जाऊन वीज मीटरची पाहणी करत आहेत. या कारवाईदरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, ही केवळ नियमित तपासणी नसून एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करून राबविण्यात येत असलेली मोहीम असल्याचा गंभीर आरोप आता उघडपणे केला जात आहे. नागरिक सांगतात की, महावितरणचे कर्मचारी अचानक घरांमध्ये प्रवेश करून मीटर तपासणी करत आहेत. काही ठिकाणी महिलाच घरात असताना देखील पथके जबरदस्तीने आत शिरत असल्याचे आरोप समोर आले आहेत. मीटरमध्ये किरकोळ फॉल्ट किंवा तांत्रिक अडचण आढळली तरी तात्काळ जुने मीटर काढून नवीन डिजिटल मीटर बसवले जात आहेत. मात्र याबाबत ग्राहकांना योग्य माहिती, लेखी नोटीस किंवा समाधानकारक स्पष्टीकरण दिले जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

विशेष म्हणजे, या मोहिमेदरम्यान अनेकांच्या घरांची वीज पुरवठा थेट खंडित करण्यात येत असल्याचेही आरोप होत आहेत. काही नागरिकांनी सांगितले की, मोबाईलवर फोन करून लाईन कट करण्याचे आदेश दिले जात आहेत आणि काही मिनिटांतच संपूर्ण घर अंधारात जात आहे. सध्या प्रचंड उष्णतेचे दिवस सुरू असून तापमान चाळिशी पार गेले असताना अचानक वीज खंडित केल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. घरात लहान मुले, आजारी व्यक्ती, वृद्ध नागरिक असताना तासन्तास वीज नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, जर ही मोहीम संपूर्ण शहरासाठी असेल तर मग कारवाई प्रामुख्याने अल्पसंख्याक बहुल भागांमध्येच का सुरू आहे? शहरातील इतर भागांमध्ये अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात पथके का दिसत नाहीत? एका विशिष्ट समाजाच्या वस्त्यांमध्येच पोलिस बंदोबस्तासह धडक कारवाई का केली जात आहे? या प्रश्नांमुळे आता या मोहिमेवर संशयाचे सावट गडद होत आहे.

नागरिकांच्या मते, महावितरणने वीज चोरी रोखणे हे निश्चितच आवश्यक आहे. परंतु त्या नावाखाली सामान्य नागरिकांना गुन्हेगारासारखी वागणूक देणे योग्य नाही. कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अचानक घरांमध्ये घुसणे, महिलांशी उर्मट भाषा वापरणे, मीटर तातडीने बदलणे आणि लाईन कट करण्याची धमकी देणे या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही भागांमध्ये नागरिक आणि महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाल्याची माहितीही समोर येत आहे.

या मोहिमेदरम्यान पोलिस प्रशासनाचा वापर करून नागरिकांवर दबाव टाकला जात असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. पोलिसांची उपस्थिती पाहून अनेक नागरिक भीतीपोटी काहीही बोलण्यास तयार नसल्याचे दिसून आले. “आम्ही वीज चोर नाही, मग आमच्या घरांवरच धाडी का?” असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांनीही या प्रकरणात उडी घेतली असून संपूर्ण मोहिमेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. जर ही कारवाई नियमांनुसार असेल तर ती संपूर्ण शहरात समान पद्धतीने राबवावी, अन्यथा एका विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा आरोप अधिक तीव्र होईल, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. काही नागरिकांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्याची तयारी सुरू केली आहे.

महावितरण प्रशासनाकडून मात्र अद्याप या आरोपांवर अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. वीज चोरी रोखण्यासाठी मोहीम सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी नागरिकांच्या आरोपांमुळे ही मोहीम आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रशासनाने तातडीने या विषयात हस्तक्षेप करून नागरिकांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.

एकीकडे वाढती वीज चोरी रोखण्याचे कारण पुढे केले जात असताना दुसरीकडे सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती, रोष आणि असंतोष प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. जर वेळेत या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत तर येत्या काळात या मोहिमेविरोधात मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu