प्रेमविवाहानंतरच्या वादातून तरुणाचा खून; यवतमाळ शहर हादरले
यवतमाळ : प्रेमविवाहातून निर्माण झालेल्या कौटुंबिक वादाचे रूपांतर अखेर रक्तरंजित हत्येत झाल्याची धक्कादायक घटना यवतमाळ शहरात उघडकीस आली आहे. भररस्त्यात ऑटोचालकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
मृत युवकाचे नाव सैय्यद वसीम सैय्यद रईस उर्फ शहेबाज (वय 34, रा. मिर्झानगर, यवतमाळ) असे आहे. तो व्यवसायाने ऑटो रिक्षाचालक होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सैय्यद वसीम याने तीन वर्षांपूर्वी एका तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. या विवाहाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये सातत्याने वाद सुरू होते. संबंधित तरुणीचे यापूर्वी दुसऱ्या युवकासोबत लग्न ठरल्याची माहिती समोर येत आहे. त्यातून निर्माण झालेला राग आणि कौटुंबिक तणाव अखेर जीवघेणा ठरल्याचे बोलले जात आहे.
गुरुवारी सकाळच्या सुमारास शहरातील एका रस्त्यावर सैय्यद वसीम याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्याच्यावर सपासप वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून त्याच्या आधारे दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासात हा प्रकार पूर्ववैमनस्य आणि प्रेमविवाहातून निर्माण झालेल्या वादातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या घटनेमुळे यवतमाळ शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

No comments:
Post a Comment