वाहतुकीच्या शिस्तीसह विकासकामांचा धडाका; यवतमाळ शहराचा चेहरामोहरा बदलणार — नगराध्यक्षा ॲड. प्रियदर्शिनी उईके
यवतमाळ : शहरातील नागरिकांना अधिक सक्षम, पारदर्शक आणि परिणामकारक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेकडून विविध विकासकामांचा वेगाने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती नगराध्यक्षा ॲड.. प्रियदर्शिनी उईके यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांची कामे हाती घेण्यात आली असून, आगामी काळात यवतमाळ शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नगर परिषदेकडून शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासोबतच मूलभूत सुविधांवर विशेष भर दिला जात आहे. स्वच्छता व्यवस्थापनासाठी सुमारे ५ कोटी रुपयांच्या खर्चातून आधुनिक शेड उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. सावरगाव परिसरात बायोमायनिंग प्रक्रियेद्वारे कचऱ्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन करण्यात येत असून, तेथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये वृक्षारोपण आणि सौंदर्यीकरणासाठी सुमारे ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी एस.बी.आय. चौक आणि शारदा चौक परिसरात सुमारे २८ लाख रुपयांच्या खर्चातून आधुनिक सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
नगर परिषदेमार्फत शासकीय सेवांसाठी ‘आदर्श आपली सेवा केंद्र’ सुरू करण्यात आले असून, मालमत्ता हस्तांतरण प्रक्रियेत नागरिकांना दिलासा देण्यासाठी १ टक्का फेरफार शुल्क रद्द करण्यात आले आहे. महिलांच्या सुविधेसाठी शहरात २८ लाख रुपयांच्या खर्चातून स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येत आहेत.
वाघापूर परिसरातील आदिवासी बांधवांसाठी सुमारे ३ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीतून ‘श्याम दादा कोलाम सभागृह’ उभारण्याचे काम सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत ४२१ घरकुलांना मंजुरी मिळाली असून, त्यासाठी १.४५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. याशिवाय शहरी आवास योजनेंतर्गत २५० घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे.
‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत शहरात १.१७ कोटी रुपयांच्या निधीतून सोलर हायमास्ट दिवे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या सर्व प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला गती मिळणार असून, नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास नगराध्यक्षा अॅड. प्रियदर्शिनी उईके यांनी व्यक्त केला.
यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, भाजप गटनेते नितीन गिरी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनीही शहर विकासासाठी नागरिकांनी नगर परिषदेला सहकार्य व विश्वास देण्याचे आवाहन केले.

No comments:
Post a Comment