लाडकी बहीण योजनेतील वंचित महिलांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
१५ दिवसांत प्रश्न निकाली काढा, अन्यथा मंत्र्यांच्या घरावर मोर्चा – मनिषा काटे (भोसले)
यवतमाळ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून विविध कारणांमुळे वंचित राहिलेल्या महिलांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी युवती काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. कार्याध्यक्ष मनिषा काटे (भोसले) आणि जावेद भैय्या काझी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेमधील अडचणी, तांत्रिक त्रुटींमुळे प्रलंबित राहिलेले अर्ज, नवीन पात्र महिलांना अर्ज करण्याची संधी न मिळणे तसेच विविध कारणांनी लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने महिलांनी या आंदोलनात सहभाग घेत आपल्या मागण्यांना जोरदार पाठिंबा दिला.
मोर्चानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मनिषा काटे (भोसले) यांनी शासनाला इशारा देत सांगितले की, “लाडकी बहीण योजनेतील वंचित महिलांच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात. पुढील १५ दिवसांत ठोस निर्णय घेऊन प्रश्न निकाली काढावेत. अन्यथा संबंधित मंत्र्यांच्या निवासस्थानी पुढील तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
निवेदनात ई-केवायसीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नवीन पात्र युवती आणि महिलांसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, तांत्रिक कारणांमुळे अडकलेल्या अर्जांना दुरुस्तीची संधी द्यावी आणि ITR_relative या कारणावरून अपात्र ठरविण्यात आलेल्या महिलांच्या प्रकरणांची पारदर्शक फेरतपासणी करून पात्र लाभार्थींना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय, योजनेचा लाभ नियमितपणे मिळत असताना अचानक हप्ते बंद झालेल्या महिलांचे लाभ तात्काळ पूर्ववत करावेत, अशीही मागणी करण्यात आली. शासनाने कोणतीही पात्र महिला योजनेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या आंदोलनात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्ष मनिषा काटे (भोसले), शांतता समिती जिल्हा सदस्य तथा पोलीस मित्र जावेद भैय्या काझी, शेतकरी चळवळीचे प्रा. पंढरी पाठे, दिलीप इंगोले, युवक जिल्हाध्यक्ष संकेत टोणे, शीतल कुरटकर, ओंकार चव्हाण, राजेश चिंतावार, मोनिका निनावे, संगीता ठाकरे, रामदास बनकर, विरेंद्र चव्हाण, जयश्री हजारे, चंदा आत्राम, संजय मेश्राम, नर्मदा राठोड, विजू पोटे, सुजाता भगत, सुनंदा गोडबोले, रेखा सोनावणे, लक्ष्मी मोहोड यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिलांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली. या मोर्चामुळे लाडकी बहीण योजनेतील वंचित महिलांच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधले गेले आहे.


No comments:
Post a Comment