उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळची धडक कारवाई; 17 कोटींहून अधिक दंड आकारणी - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Tuesday, June 2, 2026

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळची धडक कारवाई; 17 कोटींहून अधिक दंड आकारणी

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळची धडक कारवाई; 17 कोटींहून अधिक दंड आकारणी

यवतमाळ : रस्ते सुरक्षेला प्राधान्य देत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यवतमाळ यांनी व्यापक विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेदरम्यान विविध नियमभंगाच्या एकूण 17 कोटी 6 लाख 4 हजार 559 रुपयांच्या दंडाची आकारणी करण्यात आली असून त्यापैकी 14 कोटी 19 लाख 38 हजार 17 रुपये वसूल करण्यात आले आहेत.



आरटीओ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वाहन चालक व मालकांकडून होणाऱ्या नियमभंगांवर लक्ष केंद्रित करून जिल्हाभर तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत हेल्मेट न वापरणे, सीट बेल्ट न लावणे, ओव्हरलोड वाहतूक, विमा नसणे, फिटनेस प्रमाणपत्र मुदतबाह्य असणे, वैध परवाना नसणे, नंबर प्लेटमधील त्रुटी तसेच वाहनांवरील दिपवणारे (Dazzling) दिवे यांसारख्या नियमभंगांवर कठोर कारवाई करण्यात आली.

कारवाईचा तपशील

हेल्मेट नसलेली प्रकरणे – 7,563

सीट बेल्ट न वापरणे – 5,299

ओव्हरलोड वाहतूक – 2,083

विमा नसलेली वाहने – 1,615

फिटनेस प्रमाणपत्र मुदतबाह्य – 1,573

परवाना नियमभंग – 1,091 पेक्षा अधिक प्रकरणे

नंबर प्लेट नियमभंग – 2,319

दिपवणारे दिवे (Dazzling Lights) – 286

याशिवाय वाहननिहाय तपासणीत 430 बसेस आणि 53 शालेय बसांची विशेष तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान सुरक्षाविषयक नियमांचे पालन होत आहे की नाही, याची खातरजमा करण्यात आली.

रस्ता सुरक्षा आणि नियमपालनावर भर

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहन चालकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. हेल्मेट, सीट बेल्टचा वापर, वैध कागदपत्रे बाळगणे तसेच वाहनांची नियमित तपासणी करून फिटनेस आणि विमा अद्ययावत ठेवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अशी कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असून, रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आरटीओ प्रशासन कटिबद्ध असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu