महागांव तहसील परिसरातील सेतू केंद्रासमोरील 'अर्जनिस' टेबलवर आक्षेप; अनधिकृत वसुलीच्या आरोपांची चौकशीची मागणी
तहसीलदारांना निवेदन; नागरिकांची आर्थिक पिळवणूक, गर्दी व मादक पदार्थ सेवनाच्या आरोपांनी खळबळ
विशेष प्रतिनिधी : एस. के. शब्बीर | महागाव
महागाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणातील सेतू केंद्रालगत उभारण्यात आलेले खाजगी अर्जनिस टेबल तात्काळ हटविण्यात यावे, तसेच नागरिकांकडून होत असल्याचा आरोप असलेल्या अनधिकृत वसुलीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एकता पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किशोर भीमराव राऊत यांनी तहसीलदारांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, विविध दाखले, प्रमाणपत्रे आणि शासकीय कागदपत्रांसाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांकडून अर्ज भरून देणे, कागदपत्रांची पूर्तता करून देणे आदी कामांच्या नावाखाली अवाजवी शुल्क आकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. योग्य माहिती नसल्याचा फायदा घेत अनेक लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची चर्चा परिसरात सुरू असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, सेतू केंद्राच्या परिसरात काही व्यक्तींकडून मादक पदार्थांचे सेवन होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे तहसील कार्यालयासारख्या सार्वजनिक ठिकाणचे वातावरण दूषित होत असून महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व इतर नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
सेतू केंद्राच्या खिडकीसमोरच अर्जनिसाचे टेबल असल्यामुळे प्रमाणपत्रांसाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. परिणामी गर्दी, गोंधळ आणि गैरसोय वाढून सेतू केंद्राच्या नियमित कामकाजावरही परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
किशोर राऊत यांनी तहसील प्रशासनाकडे संबंधित टेबल तातडीने हटविणे, अनधिकृत शुल्कवसुलीची सखोल चौकशी करणे आणि सार्वजनिक ठिकाणी मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


No comments:
Post a Comment