कर्तव्यनिष्ठ सेवेला मिळाला सन्मान; महागावचे वसीम शेख पोलीस जमादारपदी पदोन्नत
महागाव | प्रतिनिधी : शेख नूर शेख हैदर
महागाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी वसीम सुलेमान शेख यांची पोलीस नायक पदावरून पोलीस जमादार पदावर पदोन्नती झाल्याने महागाव तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी, मित्रपरिवार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि जबाबदारीची जाणीव या गुणांच्या बळावर वसीम शेख यांनी आपल्या सेवाकाळात वेगळी ओळख निर्माण केली आहे. महागाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांचे रायटर म्हणून त्यांनी अत्यंत जबाबदारीने काम पाहिले असून, प्रत्येक काम वेळेत, अचूक आणि संयमाने पूर्ण करण्याच्या त्यांच्या कार्यशैलीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे.
महागाव पोलीस ठाण्यात गेल्या काही वर्षांत अनेक पोलीस निरीक्षकांनी कार्यभार सांभाळला. या काळात वसीम शेख यांनी प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत उत्कृष्ट समन्वय राखत आपल्या सातत्यपूर्ण आणि निष्ठावान सेवेमुळे विश्वास संपादन केला. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना पोलीस जमादार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
या पदोन्नतीनिमित्त एकता पत्रकार संघ, महागाव यांच्या वतीने वसीम शेख यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या पुढील सेवाकाळासाठी शुभेच्छा देताना, जनतेप्रती असलेली त्यांची सेवाभावाची वृत्ती आणि कर्तव्यदक्ष कार्यशैली यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा अधिक उंचावेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
वसीम शेख यांच्या पदोन्नतीबद्दल तालुक्यातील नागरिक, मित्रपरिवार, पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून भविष्यातील सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:
Post a Comment