आर्णीतील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी; इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे नगर परिषदेला निवेदन
आर्णी (यवतमाळ) : आर्णी शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अनधिकृत अतिक्रमणामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून नागरिकांना विविध मूलभूत सुविधांच्या अभावालाही सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने आर्णी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. शहरातील अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करणे, सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि शहराचा सर्वांगीण विकास करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत अतिक्रमणे झाल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः माहूर चौक, बसस्थानक परिसर, शिवनेरी चौक, पाण्याची टाकी परिसर, तहसील कार्यालय परिसर आणि दत्तरामपूर भागात सतत वाहतूक कोंडी होत असून नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे अपघातांचा धोकाही वाढला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
असोसिएशनने शहरातील मूलभूत नागरी सुविधांच्या अभावाकडेही लक्ष वेधले आहे. शहरात अनेक ठिकाणी प्रवाशांसाठी बस शेल्टर उपलब्ध नसल्याने उन्हाळा, पावसाळा आणि इतर प्रतिकूल वातावरणात नागरिकांना उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. विशेषतः विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे महिला नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचा मुद्दाही निवेदनातून मांडण्यात आला आहे.
असोसिएशनने नगर परिषदेकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. शहरातील सर्व अनधिकृत अतिक्रमणे तातडीने हटवून रस्ते मोकळे करण्यात यावेत, नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था निर्माण करावी, प्रमुख चौकांमध्ये आधुनिक बस शेल्टर उभारावेत, महिला व नागरिकांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत, वाहतूक पोलीस विभागाच्या समन्वयाने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रभावी नियोजन करावे तसेच शहरात नियमित स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती, वृक्षारोपण आणि सुशोभीकरणाची कामे तातडीने हाती घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष सय्यद झाकीर हुसैन यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, "आर्णी शहरातील नागरिक आणि प्रवाशांना आज मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. अतिक्रमणामुळे वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून अपघातांचा धोका वाढत आहे. महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत, तर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना बसची प्रतीक्षा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने यापुढेही या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल."
दरम्यान, या निवेदनानंतर आर्णी नगर परिषद प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते आणि शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणती ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment