सवना येथे अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर महागाव पोलिसांची धडक कारवाई; हजारो रुपयांचा मुद्देमाल नष्ट
महागाव | प्रतिनिधी : शेख नूर शेख हैदर
महागाव पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार सुनील अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सवना परिसरात अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात मोठी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत अनेक अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापे टाकून दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायनयुक्त कच्चा माल, तयार हातभट्टी दारू, ड्रम, भांडी तसेच इतर साहित्य असा हजारो रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.
पोलीस पथकाला सवना परिसरात अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करून तिची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही अवैध व्यवसाय करणारे व्यक्ती घटनास्थळावरून पळून गेले. फरार झालेल्यांचा शोध पोलीस घेत असून त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात तयार हातभट्टी दारू तसेच दारू गाळण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले. या धडक मोहिमेमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून बेकायदेशीर धंद्यांना चाप बसण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांचे मत आहे.
अवैध हातभट्टी दारूमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता अशा बेकायदेशीर व्यवसायांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा महागाव पोलिसांनी दिला आहे.
प्रभारी ठाणेदार सुनील अंबुरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या विशेष मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले असून, तालुक्यातील इतर भागांतील अवैध धंद्यांवरही अशाच प्रकारच्या सातत्यपूर्ण कारवाया करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment