कोदंरी येथे स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमणाचा आरोप - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Sunday, July 5, 2026

कोदंरी येथे स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमणाचा आरोप

कोदंरी येथे स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमणाचा आरोप

शासकीय जमिनीवर अनधिकृत पेरणी; तहसीलदारांकडे तात्काळ कारवाईची मागणी

महागाव | प्रतिनिधी : शेख नूर शेख हैदर

महागाव तालुक्यातील मौजा कोदंरी येथील ग्रामपंचायतीकडे स्मशानभूमीसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून पेरणी करण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. याप्रकरणी कोदंरीचे सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवि पवार यांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, सर्व्हे क्रमांक ११६ मधील भोगवटा वर्ग-२ शासकीय जमीन ग्रामपंचायतीकडे स्मशानभूमीसाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. या ठिकाणी शेड, पेव्हर ब्लॉक, बाके, वृक्षारोपण आदी सुविधा उभारून परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. मात्र, शंकर सवाई राठोड यांनी कोणतीही शासकीय परवानगी न घेता या जागेवर अतिक्रमण करून पेरणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या अनधिकृत पेरणीमुळे स्मशानभूमी परिसरातील वृक्षारोपणाचे नुकसान झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित व्यक्तीने परिसराला तारांचे कुंपण घालून त्यामध्ये विद्युत प्रवाह सोडल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करून स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, तसेच ग्रामस्थांना न्याय मिळावा, अशी मागणी सरपंच रवि पवार यांनी तहसीलदारांकडे केली आहे.


ठळक मुद्दे

  • स्मशानभूमीसाठी हस्तांतरित शासकीय जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप.
  • परवानगीशिवाय पेरणी केल्याचा तक्रारीत उल्लेख.
  • वृक्षारोपणाचे नुकसान झाल्याचा दावा.
  • तारांचे कुंपण करून विद्युत प्रवाह सोडल्याचाही आरोप.
  • तहसीलदारांकडे चौकशी व तातडीच्या कारवाईची मागणी.

(टीप : वरील सर्व आरोप तक्रारदारांनी केलेल्या लेखी तक्रारीवर आधारित असून संबंधित व्यक्तीची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाच्या चौकशीनंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईल.)

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu