हिवरा (संगम) ग्रामपंचायतीतील अंशकालीन स्त्री परिचर भरतीवर आक्षेप; चौकशी करून भरती रद्द करण्याची मागणी
उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार
महागाव | प्रतिनिधी : शेख नुर शेख हैदर
महागाव तालुक्यातील हिवरा (संगम) ग्रामपंचायतीमध्ये अंशकालीन स्त्री परिचर पदासाठी झालेल्या भरती प्रक्रियेवर गंभीर आक्षेप घेण्यात आला असून, या नियुक्तीची सखोल चौकशी करून भरती रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीचे उपसरपंच शरद देविदास कदम आणि सदस्य राजू किसनराव धोतकर यांनी जिल्हा परिषद, यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, अंशकालीन स्त्री परिचर पदासाठी एकूण पाच उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, अनुभव, गुणवत्ता तसेच शासनाने निर्धारित केलेले निकष विचारात न घेता प्रशासक व संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने एका उमेदवाराची निवड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अधिक पात्र व अनुभवी उमेदवारांवर अन्याय झाल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
तसेच, ग्रामपंचायतीवर प्रशासक कार्यरत असताना केवळ दैनंदिन व अत्यावश्यक प्रशासकीय कामकाज करण्याचा अधिकार असतो. अशा परिस्थितीत नवीन भरती प्रक्रिया राबवून नियुक्ती करण्यात आल्याने त्या प्रक्रियेच्या वैधतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून भरती प्रक्रियेशी संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी, नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास सदर भरती तात्काळ रद्द करावी आणि शासनाच्या नियमानुसार गुणवत्ता व अनुभवाच्या आधारे पारदर्शक पद्धतीने नव्याने भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
याशिवाय, भरती प्रक्रियेत नियमबाह्य कामकाज झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही उपसरपंच शरद देविदास कदम व सदस्य राजू किसनराव धोतकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.

No comments:
Post a Comment