यवतमाळात विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेविरोधात अभूतपूर्व तिरंगा मोर्चा; "धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय"
यवतमाळ | प्रतिनिधी : देशभरात गाजत असलेल्या पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि पारदर्शक, गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या मागणीसाठी यवतमाळ शहरातील विद्यार्थ्यांनी एक अभूतपूर्व तिरंगा मोर्चा काढून शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात तीव्र आवाज उठविला. संविधान चौक येथून सुरू झालेला हा मोर्चा छत्रपती संभाजी महाराज चौकात जाऊन सभेत परिवर्तित झाला.
या मोर्चात शहरातील विविध अकॅडमी, ट्युशन क्लासेस तसेच महाविद्यालयांतील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. हातात तिरंगा ध्वज, घोषणाबाजी आणि शिक्षणातील भ्रष्टाचाराविरोधातील फलक घेऊन विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढला. संपूर्ण मोर्चा शांततापूर्ण, नियोजनबद्ध आणि शिस्तीचे उदाहरण ठरला.
सभेदरम्यान विद्यार्थी प्रतिनिधी विनय शेजव यांनी केलेले भाषण विशेष चर्चेचा विषय ठरले. त्यांनी सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवर कठोर शब्दांत टीका करताना म्हटले, "शिक्षण व्यवस्थेमध्ये इतके किटाणू पसरले आहेत की ते नष्ट करता करता आपले संपूर्ण आयुष्य निघून जाईल, तरीही ही व्यवस्था पूर्णपणे स्वच्छ होणार नाही." त्यांच्या या वक्तव्याला उपस्थित विद्यार्थ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.
पेपरफुटी प्रकरणाचा उल्लेख करताना विनय शेजव म्हणाले की, "या आंदोलनासाठी आणि पेपरफुटीविरोधातील लढ्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्या २१ विद्यार्थ्यांचे योगदान देश कधीही विसरणार नाही. त्यांच्या संघर्षामुळेच सरकारला झुकावे लागले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला राजीनामा हा देशातील सर्व विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय आहे."
पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना एकत्र राहण्याचे आवाहन करत सांगितले की, "विद्यार्थ्यांची ही एकजूट कायम राहिली तर भविष्यात पेपरफुटीसारखे गंभीर प्रकार रोखता येतील आणि शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणता येतील."
यावेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळांच्या दयनीय अवस्थेकडेही लक्ष वेधले. "जिल्हा परिषद शाळांची इमारती जीर्ण झाल्या आहेत. शिक्षणाची गुणवत्ता खालावली असून गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. या शाळा वाचल्या पाहिजेत आणि त्यांचे सक्षमीकरण झाले पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.
सभेत इतर अनेक विद्यार्थी प्रतिनिधींनीही आपली मते मांडत शिक्षणातील भ्रष्टाचार, पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि शैक्षणिक सुधारणांची गरज यावर भाष्य केले. विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक, जबाबदार आणि गुणवत्तापूर्ण करण्याची मागणी केली.
छत्रपती संभाजी महाराज चौक येथे या कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण मोर्चा अत्यंत शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि सुनियोजित पद्धतीने पार पडल्याने नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या संघटनशक्तीचे आणि सामाजिक भानाचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी दिलेला हा संदेश केवळ पेपरफुटीविरोधातील आंदोलन नसून, देशातील शिक्षण व्यवस्थेत मूलभूत सुधारणा घडवून आणण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.



No comments:
Post a Comment