ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत यवतमाळ जिल्हा पोलिसांचा विद्यार्थी सुरक्षा व नशामुक्तीवर भर
१२०० मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय शिबिर; शाळांमध्ये सीसीटीव्ही, तक्रारपेटी, वाहतूक सुरक्षितता व व्यसनमुक्तीबाबत कडक सूचना
यवतमाळ | प्रतिनिधी : यवतमाळ जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ‘ऑपरेशन प्रस्थान’ अंतर्गत जिल्हास्तरीय विद्यार्थी सुरक्षा व नशामुक्ती शिबिराचे आयोजन शुक्रवारी (दि. २४ जुलै) यवतमाळ येथील हॉटेल डेस्टिनेशनमध्ये करण्यात आले. या शिबिरात जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, शासकीय, खासगी, मराठी तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील सुमारे १२०० मुख्याध्यापक, तालुका गटशिक्षणाधिकारी व शिक्षणविस्तार अधिकारी सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विकास मीना (भा.प्र.से.) होते, तर प्रमुख आयोजक म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंथा (भा.पो.से.) यांनी विद्यार्थी सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक शाळा आणि संपूर्ण शालेय परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी महिला वॉर्डनची नियुक्ती, शाळांमध्ये तक्रार पेटीची व्यवस्था आणि त्या तक्रारींची आठवड्यातून किमान दोन वेळा पालक-शिक्षक समिती व सखी सावित्री समितीच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत छाननी करून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शालेय बस चालक, वाहन मालक आणि वाहकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, वाहनांची नियमित तपासणी, तांत्रिक दुरुस्ती, चालक व वॉर्डनची चारित्र्य पडताळणी तसेच चालकाकडे वैध परवाना असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असलेल्या व्यक्तींना विद्यार्थी वाहतुकीशी संबंधित काम देऊ नये, अशी सूचनाही त्यांनी केली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांमध्ये तंबाखू, गुटखा, सिगारेट, ई-सिगारेट किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला अजिबात स्थान नसावे, असे सांगत शाळेच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व धूम्रपान कायद्याने बंद असल्याची आठवण करून दिली. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.
बदलापूर येथील विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या घटनेचा संदर्भ देत, शासनाने जारी केलेल्या सर्व सुरक्षा मार्गदर्शक सूचनांचे शाळा व्यवस्थापनाने काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्यास संबंधित शाळा समिती व शिक्षकांविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
"आजचे विद्यार्थी हेच उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वतःची मुले समजून त्यांच्या शिक्षणाबरोबरच सुरक्षिततेचीही काळजी घ्यावी. सुरक्षित, सुसंस्कृत आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे," असे भावनिक आवाहन पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी उपस्थित शिक्षक व शिक्षण अधिकाऱ्यांना केले.
या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी) संतोष धोत्रे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) किशोर पांगोरे यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते तसेच पोलीस हवालदार सुमित सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शाळांमधील सुरक्षा व्यवस्था, व्यसनमुक्ती जनजागृती आणि शालेय वाहतुकीतील शिस्त या चार महत्त्वाच्या विषयांवर भर देणारे हे शिबिर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांसाठी मार्गदर्शक ठरले.

No comments:
Post a Comment