मुख्य रस्त्यावरील गटारे-नाल्या तुंबल्याने दुकाने जलमय; व्यापारी व नागरिक संतप्त - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Thursday, July 23, 2026

मुख्य रस्त्यावरील गटारे-नाल्या तुंबल्याने दुकाने जलमय; व्यापारी व नागरिक संतप्त

मुख्य रस्त्यावरील गटारे-नाल्या तुंबल्याने दुकाने जलमय; व्यापारी व नागरिक संतप्त

बायपास नाल्यांतील अडथळ्यामुळे सांडपाण्याचा निचरा ठप्प; नगरपंचायतीकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

महागाव | प्रतिनिधी : शेख नुर शेख हैदर

महागाव शहरातील मुख्य पुसद–यवतमाळ मार्गालगत असलेल्या बायपासवरील गटारे व नाल्या तुंबल्याने सांडपाण्याचा निचरा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. परिणामी शहरातील विविध वार्डांमधून येणारे सांडपाणी थेट मुख्य रस्त्यावर साचत असून रस्त्यालगत असलेल्या कृषी सेवा केंद्र, दवाखाने, कापड दुकाने, किराणा दुकाने तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये पाणी शिरत आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

साचलेल्या सांडपाण्यामुळे मुख्य रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचारी, दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुर्गंधी, अस्वच्छता आणि घसरून अपघात होण्याचा धोका वाढल्याने रहदारीवरही विपरीत परिणाम होत आहे. पावसाळ्यात ही समस्या अधिकच गंभीर स्वरूप धारण करत असून संबंधित विभागाकडून वेळेवर नाल्यांची साफसफाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

स्थानिक व्यापाऱ्यांच्या मते, नाल्यांची नियमित स्वच्छता व देखभाल होत नसल्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते. दुकानांमध्ये सांडपाणी शिरल्याने मालाचे नुकसान होत असून ग्राहकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे व्यवसायावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याची खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर महागाव नगरपंचायतीने तुंबलेल्या गटारे व नाल्यांची तातडीने साफसफाई करून सांडपाण्याचा निचरा सुरळीत करावा. तसेच भविष्यात अशा प्रकारची समस्या उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक दुकानदार, व्यावसायिक आणि नागरिकांनी केली आहे.

"नाल्यांची तातडीने स्वच्छता करा; नागरिकांचा संयम संपत चालला"

महागावच्या मुख्य पुसद–यवतमाळ मार्गावर साचलेल्या सांडपाण्यामुळे व्यापारी, नागरिक आणि वाहनचालकांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. नगरपंचायत प्रशासनाने तातडीने कारवाई करून नाल्यांची स्वच्छता करावी व कायमस्वरूपी निचऱ्याची व्यवस्था उभारावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu