महागाव पोलीसांच्या प्रभावी तपासामुळे POCSO प्रकरणात आरोपीस 1 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
महागाव | प्रतिनिधी : महागाव पोलीस ठाण्यात सन 2017 मध्ये दाखल झालेल्या POCSO प्रकरणात आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणात महागाव पोलिसांनी केलेल्या प्रभावी तपासामुळे ही दोषसिद्धी शक्य झाल्याचे मानले जात आहे.
महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा क्रमांक 45/2017 मधील प्रकरणाचा निकाल मा. अतिरिक्त सत्र न्यायालय, पुसद यांनी दिला. न्यायालयाने आरोपी विश्वनाथ धोंडबा टासके यास भारतीय दंड संहिता कलम 354-अ तसेच POCSO कायदा कलम 12 अंतर्गत दोषी ठरवून एक वर्ष सक्तमजुरी आणि 25 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विश्वास पावरा यांनी केला होता. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता शर्मा मॅडम यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. तसेच न्यायालयीन प्रक्रियेत कोर्ट पैरवी अधिकारी एएसआय मोहन बिहाडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
या प्रकरणात एपीआय सुनील अंबोरे, ठाणेदार, पोलीस स्टेशन महागाव यांचेही विशेष सहकार्य लाभले. जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दोषसिद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन करत प्रकरणाचा नियमित आढावा घेतला.
या निकालामुळे अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार व छळ प्रकरणांमध्ये कठोर कारवाईचा संदेश समाजात गेला असून, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस यंत्रणा कटिबद्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

No comments:
Post a Comment