महागावात भीषण अग्नितांडव; भंगार दुकान जळून खाक, नगरपंचायतीची निष्क्रियता पुन्हा ऐरणीवर! - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Wednesday, June 17, 2026

महागावात भीषण अग्नितांडव; भंगार दुकान जळून खाक, नगरपंचायतीची निष्क्रियता पुन्हा ऐरणीवर!

महागावात भीषण अग्नितांडव; भंगार दुकान जळून खाक, नगरपंचायतीची निष्क्रियता पुन्हा ऐरणीवर!

रात्रीच्या आगीत लाखोंचे नुकसान; नगरपंचायतीची अग्निशमन गाडी दोन वर्षांपासून बंद असल्याने नागरिक संतप्त

महागाव,(तालुका प्रतिनिधी : शेख नूर शेख हैदर) : महागाव शहरातील पाटे लेआऊट परिसरात इंडियन पेट्रोल पंपाजवळ असलेल्या सलीम यांच्या भंगार दुकानाला मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची धक्कादायक घटना घडली. रात्री साडेअकराच्या सुमारास लागलेल्या या आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

भंगार दुकानात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने झपाट्याने फैलाव घेतला. आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट अनेक किलोमीटर अंतरावरून दिसत होते. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. दाट लोकवस्ती आणि पेट्रोल पंप जवळ असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत आगीने संपूर्ण दुकानाला आपल्या विळख्यात घेतले होते. अग्निशमन दल, महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या अथक प्रयत्नांनंतर अनेक तासांनी आग नियंत्रणात आणण्यात यश आले.

तहसीलदार अभय मस्के यांची तात्काळ धाव

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अभय मस्के यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी महसूल यंत्रणा सतर्क ठेवत सर्व संबंधित विभागांना समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या. आगीची तीव्रता लक्षात घेता कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात आल्या.

नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे संताप

या घटनेनंतर महागाव नगरपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहराची अग्निशमन गाडी तब्बल दोन वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत पडून असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक स्तरावर तत्काळ मदत मिळू शकली नाही, याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

"कर वसुलीत आघाडी, पण नागरिकांच्या सुरक्षेत शून्य!" अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. लाखो रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा शोभेची वस्तू बनली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेची किंमत नागरिकांना मोजावी लागत असल्याचा आरोप होत आहे.

चौकशीची मागणी

आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू असून नुकसानीचा पंचनामा करण्यात येत आहे. तसेच शहरातील अग्निसुरक्षा यंत्रणेच्या दुरवस्थेबाबत उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

महागावसारख्या वाढत्या शहरात अग्निसुरक्षेच्या मूलभूत सुविधा कार्यान्वित नसणे ही अत्यंत गंभीर बाब असून याकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu