अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची धडक कारवाई; दोन पीडित महिलांची सुटका, एक आरोपी ताब्यात
यवतमाळ, दि. १२ जून : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU), यवतमाळ यांनी वैभव नगर परिसरात सुरू असलेल्या कथित देहव्यापारावर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून एका आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वैभव नगर परिसरात अनैतिक देहव्यापार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली. तसेच या प्रकरणातील एका आरोपी महिलेला ताब्यात घेऊन तिच्याविरुद्ध पोलीस ठाणे लोहारा येथे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा, १९५६ अंतर्गत कलम ३, ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी, यवतमाळ तसेच प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक संजय खंडारे व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली असून पुढील तपास सुरू आहे.

No comments:
Post a Comment