प्रवासादरम्यान महिलेची प्रकृती बिघडली; महागाव पोलिसांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Saturday, June 13, 2026

प्रवासादरम्यान महिलेची प्रकृती बिघडली; महागाव पोलिसांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

प्रवासादरम्यान महिलेची प्रकृती बिघडली; महागाव पोलिसांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

महागाव (प्रतिनिधी : शेख नूर शेख हैदर) : महागाव पोलिसांनी पुन्हा एकदा कर्तव्यदक्षता आणि मानवतेचे दर्शन घडवत प्रवासादरम्यान अचानक प्रकृती बिघडलेल्या एका महिलेला वेळेवर वैद्यकीय मदत उपलब्ध करून देत संभाव्य अनर्थ टाळला. पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे संबंधित महिलेवर तातडीने उपचार होऊन तिची प्रकृती स्थिर करण्यात यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर महागाव पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार एपीआय सुनील आंबूरे हे नियमित गस्त घालत असताना भिसे पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या एका ट्रॅव्हल्स बसजवळ मोठी गर्दी दिसून आली. परिस्थितीची गंभीरता ओळखून त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व चौकशी केली.

यावेळी ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करणाऱ्या गुलरान अल्ताफ शेख (वय 32, रा. सोलापूर) यांना अचानक तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याचे समोर आले. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्षात येताच एपीआय सुनील आंबूरे यांनी कोणताही विलंब न करता पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने संबंधित महिला आणि त्यांचे मामा शेख शरीफ यांना तातडीने महागाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक वैद्यकीय सुविधांसाठी त्यांना महागाव शहरातील सूर्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे आवश्यक उपचारानंतर महिलेची प्रकृती स्थिर झाली. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना पुढील प्रवासासाठी सुखरूप रवाना करण्यात आले.

 


महागाव पोलिसांनी दाखविलेली तत्परता, संवेदनशीलता आणि मानवतावादी भूमिका सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे. संकटाच्या क्षणी पोलिसांनी दिलेल्या तातडीच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना महिलेच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. तसेच वेळेवर मिळालेल्या मदतीबद्दल त्यांनी महागाव पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.

महागाव पोलिसांच्या या कार्यामुळे, "पोलीस हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे नसून संकटसमयी धावून येणारे खरे आधारवड आहेत," याची पुन्हा एकदा प्रचिती नागरिकांना आली आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu