मोदी सरकारच्या कामगिरीचा यवतमाळात गौरव, पत्रकार परिषदेत माहिती
यवतमाळ, प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवार दिनांक 13 जून 2026 रोजी भाजपा जिल्हा कार्यालय दत्त चौक यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाचा आढावा घेण्यात आला. यावेळी केंद्र सरकारने गेल्या १२ वर्षांत देशाच्या विकासासाठी राबविलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग १२ वर्षे पूर्ण करत भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेल्या पंतप्रधानांपैकी एक म्हणून विक्रम प्रस्थापित केल्याचे सांगण्यात आले.
पत्रकार परिषदेत भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, देशातील २२ राज्यांमध्ये एनडीएची सत्ता असून देशातील सुमारे ८० टक्के लोकसंख्या एनडीए शासित प्रदेशांमध्ये राहते. या काळात जनकल्याण, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला.
मोदी सरकारच्या कार्यकाळात २५ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आले असून ८१ कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्याचा लाभ देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. जनधन योजनेअंतर्गत ५५ कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली. आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, किसान सन्मान निधी, स्वनिधी आणि विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी नागरिकांना थेट लाभ मिळाल्याचे सांगण्यात आले.
महिला सक्षमीकरणासाठी गॅस कनेक्शन, सुकन्या समृद्धी योजना तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा वाढता सहभाग यावरही भर देण्यात आला. देशातील १६ कोटी घरांपर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. महामार्ग, रेल्वे, मेट्रो, विमानतळ, वंदे भारत रेल्वे आणि भारतनेट यांसारख्या प्रकल्पांमुळे पायाभूत सुविधांमध्ये मोठी क्रांती झाल्याचा दावा भाजपने केला.
आर्थिक क्षेत्रात भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याचे सांगण्यात आले. जीएसटी संकलन, यूपीआय व्यवहार, ‘मेक इन इंडिया’, सेमीकंडक्टर उद्योग आणि स्टार्टअप क्षेत्रातील प्रगतीचा विशेष उल्लेख करण्यात आला. तसेच राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, महाकाल लोक, कलम ३७० हटविणे, अटल सेतू आणि विविध सिंचन प्रकल्प यांसारखे निर्णय व विकासकामे मोदी सरकारच्या दूरदृष्टीचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी मोदींच्या नेतृत्वाखाली भारताच्या आर्थिक प्रगतीची आकडेवारीही सादर करण्यात आली. त्यानुसार जीडीपी वाढ दर ७.७ टक्के, उद्योग क्षेत्रातील वाढ ८.८ टक्के, सेवा क्षेत्रातील वाढ ९.३ टक्के, उत्पादन क्षेत्रातील वाढ १०.७ टक्के, व्यापार व वाहतूक क्षेत्रातील वाढ ११ टक्के आणि वित्तीय क्षेत्रातील वाढ १०.४ टक्के असल्याची माहिती देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चौहान, जिल्हा महामंत्री राजू पडगीलवार, रेखा कोठेकर, देवानंद पवार, शंतनू शेटे, दत्ता राहणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments:
Post a Comment