अतिक्रमण कारवाईवरून नगराध्यक्षा–काँग्रेस आमनेसामने; यवतमाळ नगरपालिकेत शाब्दिक वाद
यवतमाळ | दि. ११ जून २०२६ : यवतमाळ शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान प्रशासनाकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करत शहर काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रियदर्शनी उईके यांची भेट घेतली. मात्र, नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी झालेली ही भेट वादग्रस्त ठरली असून नगराध्यक्षा आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा 👈
शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. बबलू उर्फ अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेक लहान व्यावसायिकांचे रोजगार धोक्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच कारवाई निवडक लोकांवरच करण्यात येत असल्याचा आरोपही पदाधिकाऱ्यांनी केला.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी नगराध्यक्षा प्रियदर्शनी उईके यांच्या दालनात गेल्यानंतर त्यांनी कथितपणे, "माझ्या केबिनमध्ये येण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?" असा सवाल केला. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वादाची ठिणगी पडली.
यावर प्रतिक्रिया देताना प्रा. डॉ. बबलू उर्फ अनिल देशमुख यांनी नगराध्यक्षा यांना उद्देशून, "तुम्हाला जनतेने निवडून दिले आहे. तुम्ही ज्या खुर्चीवर बसल्या आहात ती लोकसेवा आणि जनकल्याणासाठी आहे. जनतेचे प्रश्न घेऊन आलेल्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना अशा प्रकारे प्रश्न विचारणे योग्य नाही," असे स्पष्ट शब्दांत सांगितल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या घटनेदरम्यान दोन्ही बाजूंनी आपापली भूमिका ठामपणे मांडली. नगराध्यक्षा आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याचे सांगितले जात असताना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारण्याचा अधिकार कायम राहणार असल्याची भूमिका घेतली.
दरम्यान, या घटनेमुळे यवतमाळच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून अतिक्रमण हटाव मोहिमेतील कथित पक्षपाती कारवाईचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आगामी काळात या प्रकरणावर प्रशासन आणि राजकीय पक्षांकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
यावेळी गटनेत्या वैशाली सवाई, सोशल मीडिया काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके, नंदू कुडमेथे, सुनील बोरकर, किशोर बडे, अनुप नैताम, साधना शंभरकर, रवी शंभरकर, अत्तरसिंग चव्हाण, असमत खान, जावेद अख्तर, राजेंद्र गौतम पाटील, विक्की राऊत, वृषभ गुल्हाने, ओम तिवारी, विशाल पावडे, तन्वीर शाह, छोटू सवाई, गिरीश खंदेडिया, नईम पैलवान, पडाळे सर, शेतकरी चळवळीचे प्रा. पंढरी पाठे तसेच काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.


No comments:
Post a Comment