विधान परिषद निवडणूक वाद: उमेदवारांसोबत शिफारसदारांचीही चौकशी व्हावी – मोहम्मद आसिम अली - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Thursday, June 11, 2026

विधान परिषद निवडणूक वाद: उमेदवारांसोबत शिफारसदारांचीही चौकशी व्हावी – मोहम्मद आसिम अली

विधान परिषद निवडणूक वाद: उमेदवारांसोबत शिफारसदारांचीही चौकशी व्हावी – मोहम्मद आसिम अली

यवतमाळ-वर्धा-चंद्रपूर-अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीदरम्यान घडलेल्या घडामोडींची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच केवळ उमेदवारावर नव्हे तर उमेदवारीसाठी शिफारस करणाऱ्या नेते व पदाधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नई परवाज मूव्हमेंट (विदर्भ)चे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेस कार्यकर्ते मोहम्मद आसिम अली यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सविस्तर पत्र व ई-मेल पाठवून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची विनंती केली आहे.

या मागणीच्या अनुषंगाने यवतमाळ येथे शासकीय विश्राम गृहात दि. ११ जून २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या पत्रकार परिषदेत मोहम्मद आसिम अली यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हा केवळ एका उमेदवाराचा प्रश्न नसून उमेदवार निवड प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निर्णयप्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा विषय आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, प्रदेश काँग्रेस नेतृत्वाने केवळ उमेदवारावर कारवाई करून आपली जबाबदारी संपली असे समजू नये. उमेदवारीसाठी शिफारस कोणी केली, नाव पक्षश्रेष्ठींकडे कोणी पाठविले आणि या संपूर्ण प्रक्रियेच्या मागे कोणते नेते किंवा पदाधिकारी होते, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच शिफारस प्रक्रियेत सहभागी सर्व संबंधितांची नावे जाहीर करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर संघटनात्मक कारवाई करण्यात यावी, अन्यथा भविष्यात अशा घटना पुन्हा घडत राहतील आणि त्याचा फटका प्रामाणिक कार्यकर्त्यांना बसत राहील, असेही त्यांनी नमूद केले.

काँग्रेस पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते वर्षानुवर्षे निष्ठेने काम करत असूनही त्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पक्षात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जबाबदारीची ठोस व्यवस्था निर्माण करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि कोणत्याही गटाशी संबंध नसलेले प्रामाणिक काँग्रेस कार्यकर्ते यांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शेवटी त्यांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा, अशी मागणी केली.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu