यवतमाळ शहरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त; तीन ठिकाणी कारवाई, तिघांविरुद्ध गुन्हे दाखल - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Wednesday, June 10, 2026

यवतमाळ शहरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त; तीन ठिकाणी कारवाई, तिघांविरुद्ध गुन्हे दाखल

यवतमाळ शहरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त; तीन ठिकाणी कारवाई, तिघांविरुद्ध गुन्हे दाखल

यवतमाळ, दि. ९ जून : महाराष्ट्र राज्यात सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री व साठ्यावर बंदी असतानाही यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा ठेवून विक्री केली जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. अन्न सुरक्षा विभागाच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करत सुमारे १० हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचा प्रतिबंधित माल जप्त केला असून तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ८ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास यवतमाळ शहरातील विविध पान सेंटरवर छापे टाकण्यात आले. पहिल्या कारवाईत राहुल ज्ञानराज ठेंगळे (वय ४९, रा. पाटीपुरा, यवतमाळ) याच्या ताब्यातून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची २.०५५ किलो वजनाची व सुमारे ३,९६० रुपये किमतीची सामग्री जप्त करण्यात आली.

दुसऱ्या कारवाईत दीपक संजय निनावे (वय २८, रा. अंबिका नगर, यवतमाळ) याच्या ताब्यातून ९१९.२ ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या मालाची किंमत सुमारे १,८७० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तिसऱ्या कारवाईत अक्षय दिलीप गुळ्हाणे (वय ३२, रा. मो. गोल पान सेंटर परिसर, यवतमाळ) याच्या ताब्यातून ५.४ किलो वजनाचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त मालाची किंमत सुमारे ४,९०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या तिन्ही प्रकरणांमध्ये अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu