पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या तपासाला मोठे यश; चार बालहत्यांतील आरोपी दोषी
भुसावळ (रावेर) येथील चार बालहत्यां व बलात्कार प्रकरणात न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
यवतमाळ, दि. ५ जून : यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी यापूर्वी जळगाव येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना तपास केलेल्या भुसावळ (रावेर) येथील चार बालहत्यां व बलात्कार प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील उत्कृष्ट तपासामुळे यवतमाळ पोलिस दलाच्या कार्यक्षमतेची राज्यभर चर्चा होत आहे.
ऑक्टोबर २०२० मध्ये जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात एका शेतातील घरात चार अल्पवयीन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण राज्य हादरले होते. या प्रकरणात दोन मुली व दोन मुलांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पुढील तपासात एका १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने बलात्कारासह विविध गंभीर कलमांची भर घालण्यात आली.
घटनास्थळ अत्यंत एकांतात असल्याने आणि कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध नसल्याने तपास पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरला होता. तरीही पारंपरिक तपास पद्धती, तांत्रिक विश्लेषण, परिस्थितीजन्य पुरावे आणि ‘लास्ट सीन थिअरी’चा प्रभावी वापर करून तपास पथकाने आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले. तपासादरम्यान महेंद्र सीताराम बोरले (रा. रसलपूर, ता. भुसावळ, जि. जळगाव) याच्याविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्यात आले. घटनास्थळावरील वैज्ञानिक पुरावे, आरोपीच्या हालचाली आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पुराव्यांची मजबूत साखळी उभी करण्यात आली.
तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. विशेष न्यायालय, भुसावळ येथे खटल्याची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने हा गुन्हा अत्यंत क्रूर, अमानवीय आणि समाजाला हादरवून टाकणारा असल्याचे नमूद केले. चार निष्पाप बालकांच्या सामूहिक हत्येसह लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ (Rarest of Rare) स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपी महेंद्र बोरले याला फाशीची शिक्षा सुनावली.
या प्रकरणातील तपासासाठी तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा विद्यमान यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनीदेखील या उत्कृष्ट तपासाबद्दल कुमार चिंता यांचे अभिनंदन केले असून हा निकाल यवतमाळ जिल्हा पोलिस दलासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून गंभीर गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांच्या काटेकोर आणि वैज्ञानिक कार्यपद्धतीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

No comments:
Post a Comment