यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या – वंचित बहुजन आघाडीची मागणी - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Saturday, June 6, 2026

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या – वंचित बहुजन आघाडीची मागणी

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या वंचित बहुजन आघाडीची मागणी


 महागाव, (ता. प्रतिनिधी / शेख नूर शेख हैदर) : यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अटी-शर्ती न लावता सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने राज्य सरकारकडे केली आहे. या मागणीसाठी आघाडीच्या वतीने आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला असून, जिल्हाध्यक्ष डी. के. दामोधर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाकडून नुकतेच कर्जमाफीबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होत असताना, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष दिलासा देण्याची गरज असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.


निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यवतमाळ हा राज्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील पहिल्या शेतकरी आत्महत्येची नोंदही याच जिल्ह्यात झाली होती. मात्र, आजही शेतकरी आत्महत्या थांबविण्यात शासनाला अपेक्षित यश मिळालेले नाही. सततची नापिकी, अतिवृष्टीमुळे झालेले मोठे नुकसान आणि वाढते आर्थिक संकट यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला आहे.

याशिवाय, यवतमाळ जिल्ह्याला पीक विमा योजनेतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रस्थापित नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रभावी भूमिका बजावण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला होता. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन विशेष बाब म्हणून संपूर्ण जिल्ह्यास सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu