भरदिवसा घरात घुसले अन् संपवला जीव; यवतमाळात खळबळ
यवतमाळ : यवतमाळ शहरातील जामनकर नगर परिसरात जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका ३० वर्षीय तरुणाची घरात घुसून धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत तरुणाचे नाव तेजस गायकवाड (रा. जामनकर नगर, यवतमाळ) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेजस हा आपल्या पत्नीसोबत बाहेरगावी गेला होता. गुरुवारी दुपारी तो यवतमाळला परतल्यानंतर त्याची पत्नी काही कामानिमित्त बाहेर गेली होती, तर तेजस घरात एकटाच होता.
दुपारी सुमारे १.१५ वाजताच्या सुमारास काही तरुण घरात घुसले. त्यांनी तेजसवर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. हल्ला इतका भीषण होता की त्याच्या मान, पाठी, डोक्यावर तसेच शरीराच्या विविध भागांवर गंभीर जखमा झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तेजसला पाहून परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
जखमी अवस्थेत तेजसला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या वैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेपूर्वी तेजसच्या मोबाईलवर एक फोन आला होता. त्यानंतर तो कोणाला तरी भेटण्यासाठी घराबाहेर पडल्याचे सांगितले जात आहे. याच कारणावरून आरोपींनी नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण, जुन्या वादाचे स्वरूप आणि हल्ल्यात सहभागी इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक कार्यरत आहे. पुढील तपास अवधूतवाडी पोलिस करीत आहेत.


No comments:
Post a Comment