‘चाचा का ढाबा’ संचालकावर जीवघेणा हल्ला; २४ तासांत दोन आरोपी जेरबंद, चोरीचा मुद्देमाल हस्तगत
यवतमाळ | प्रतिनिधी : पांढरकवडा रोडवरील प्रसिद्ध ‘चाचा का ढाबा’ चे संचालक सुनील महादेव पाली (वय ५५) यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी यवतमाळ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोन आरोपींना अटक करून चोरीस गेलेला शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि यवतमाळ शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले.
घटना १३ जून रोजी दुपारी पांढरकवडा रोडवरील शेत परिसरात घडली. सुनील पाली हे आपल्या शेतात असताना दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्या बोटातील सोन्याची अंगठी हिसकावून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सतीश उर्फ शेंबड्या उर्फ मंग्या बाबाराव मडावी (वय २५, रा. दादाबाबाशा नगर, राळेगाव रोड, यवतमाळ) आणि शेख समीर उर्फ छोट्या शेख इस्राईल (वय २२, रा. बँकेडीपुरा, यवतमाळ) यांना ताब्यात घेतले.
पोलिसी चौकशीत दोन्ही आरोपींनी सुनील पाली यांच्यावरील हल्ल्याची कबुली दिली. तसेच त्याच दिवशी सकाळी पांढरकवडा रोडवरील एका शेतातून ५ एचपी क्षमतेची पाण्याची मोटार चोरी केल्याचीही माहिती उघड झाली.
या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून सुमारे १ लाख १३ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये अंदाजे ७ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि चोरीस गेलेली ५ एचपी पाण्याची मोटार यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेला आरोपी सतीश उर्फ शेंबड्या उर्फ मंग्या मडावी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास यवतमाळ शहर पोलीस करीत आहेत.

No comments:
Post a Comment