इजनीतील ४२ कुटुंबे घरकुल योजनेपासून वंचित; चौकशीची मागणी, बीडीओंकडे तक्रार - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Saturday, June 20, 2026

इजनीतील ४२ कुटुंबे घरकुल योजनेपासून वंचित; चौकशीची मागणी, बीडीओंकडे तक्रार

इजनीतील ४२ कुटुंबे घरकुल योजनेपासून वंचित; चौकशीची मागणी, बीडीओंकडे तक्रार

महागाव, दि. १९ जून (प्रतिनिधी - शेख नुर शेख हैदर) : महागाव तालुक्यातील इजनी गावातील ४२ कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीची पडताळणी न करता लाभार्थ्यांना अतिक्रमणधारक घोषित केल्याचा आरोप करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इजनी गावातील संबंधित ४२ कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून त्याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. मात्र, घरकुल योजनेचा लाभ देताना ग्रामपंचायतीमार्फत या कुटुंबांना अतिक्रमण केलेल्या जागेवर राहत असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे त्यांना योजनेपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

विशेष म्हणजे, याच कुटुंबांना यापूर्वी विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे. सन २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधून देण्यात आले होते. तसेच मनरेगा अंतर्गत विविध कामांचे लाभही देण्यात आले असून काही कुटुंबांना जुन्या झोपडी योजनांचा लाभ मिळाल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता अचानक या कुटुंबांना अतिक्रमणधारक घोषित करण्यामागील निकष आणि नियमावली कोणती, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तक्रारीनुसार, गावातील काही राजकीय व्यक्तींच्या दबावामुळे आणि ग्रामपंचायत सचिव तसेच काही सदस्यांच्या संगनमतातून पात्र लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. तर काही अपात्र व्यक्तींची नावे लाभार्थी यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, घरकुल योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रत्यक्ष पाहणी किंवा शहानिशा न करता संबंधित कुटुंबांना अतिक्रमणधारक ठरविले. अनेक वर्षांपासून गावात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना डावलून काही लोकप्रतिनिधींनी आपल्या निकटवर्तीयांची नावे योजनेच्या यादीत समाविष्ट केली असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या प्रकारामुळे प्रभावित कुटुंबांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पात्र असूनही घरकुलाच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याने संबंधित कुटुंबांनी न्यायाची मागणी केली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित जागेची प्रत्यक्ष मोजणी व पाहणी करण्यात यावी, तसेच संबंधित ४२ कुटुंबे खरोखरच अतिक्रमण केलेल्या जागेवर राहत आहेत की नाही, याची खातरजमा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम उमरे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती महागाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा आणि घरकुल योजनेचा लाभ तातडीने मिळावा, अशी मागणी केली आहे. प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे आता इजनी गावासह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu