नगरपंचायत परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात; समोरच ही अवस्था तर शहरातील १ ते १७ प्रभागांचे काय?
नागरिकांचा संतप्त सवाल
महागाव ता.प्रतिनिधि शेख नुर शेख हैदर
महागाव : शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत असल्याचा दावा करणाऱ्या नगरपंचायतीच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नगरपंचायत कार्यालयाच्या परिसरातच घाणीचे ढिग, पहिल्याच पावसात साचलेले घाणपाणी आणि अस्वच्छ वातावरण पाहायला मिळत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नगरपंचायत कार्यालयासमोरच साचलेल्या घाणपाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. डासांची उत्पत्ती वाढण्यासही या परिस्थितीमुळे पोषक वातावरण निर्माण झाले असून साथीच्या आजारांचा धोका वाढल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
"नगरपंचायत कार्यालयासमोरच स्वच्छतेची ही अवस्था असेल, तर शहरातील १ ते १७ प्रभागांमध्ये स्वच्छतेची परिस्थिती किती गंभीर असेल?" असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अनेक प्रभागांत नियमित साफसफाई होत नसल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. गटारी तुंबणे, रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग साचणे आणि नाल्यांची वेळेवर स्वच्छता न होणे यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे.
नगरपंचायतीने शहर स्वच्छतेसाठी तातडीने विशेष मोहीम राबवून नगरपंचायत परिसरासह सर्व प्रभागांतील कचरा, साचलेले पाणी आणि अस्वच्छता दूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
एकीकडे स्वच्छता आणि आरोग्याबाबतझं जनजागृती केली जात असताना दुसरीकडे नगरपंचायत कार्यालय परिसरातील ही दयनीय अवस्था प्रशासनाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

No comments:
Post a Comment