टेलरच्या मुलीची भारतीय हॉकी संघात झेप; यवतमाळची तनुश्री कडू अंडर-21 भारतीय संघात - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Friday, June 26, 2026

टेलरच्या मुलीची भारतीय हॉकी संघात झेप; यवतमाळची तनुश्री कडू अंडर-21 भारतीय संघात

टेलरच्या मुलीची भारतीय हॉकी संघात झेप; यवतमाळची तनुश्री कडू अंडर-21 भारतीय संघात

यवतमाळ : लोहारा येथील झोपडपट्टीत राहणारी, आर्थिक अडचणींशी झुंज देत केवळ जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर यशाचे शिखर गाठणारी यवतमाळची कन्या तनुश्री दिनेश कडू हिने भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघात (अंडर-21) स्थान मिळवत जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केले आहे. साधी टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट मिळविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या तनुश्रीची ही यशोगाथा आज अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

वीस वर्षीय तनुश्री ही मिडफिल्डर म्हणून खेळते. ती 5 ते 14 जुलैदरम्यान इंग्लंडमध्ये होणाऱ्या दौऱ्यात भारतीय अंडर-21 महिला हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. आगामी ज्युनिअर आशिया कप आणि इतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीचा भाग म्हणून भारतीय संघ स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये सात सामने खेळणार आहे.

तनुश्रीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तिचे वडील दिनेश कडू हे व्यवसायाने टेलर असून दिवसभर कष्ट करून ते अवघे पाचशे रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवितात. याच उत्पन्नावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. अनेक वर्षे त्यांच्या घरात शौचालयासारखी मूलभूत सुविधाही नव्हती. अशा प्रतिकूल परिस्थितीतही तनुश्रीने आपले स्वप्न जिवंत ठेवले आणि त्यासाठी अथक परिश्रम घेतले.

शालेय जीवनात एक वेळ अशीही आली होती की, आर्थिक परिस्थितीमुळे तनुश्री शिक्षण सोडण्याच्या तयारीत होती. मात्र शाळेतील क्रीडा शिक्षक अविनाश जोशी यांनी तिला खंबीरपणे पाठबळ देत शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यास प्रोत्साहित केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच तनुश्रीने संघर्षावर मात करत आपली वाटचाल सुरू ठेवली.

तनुश्रीने आतापर्यंत हॉकी महाराष्ट्र संघाकडून सहा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून राज्य संघाचे नेतृत्वही केले आहे. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी 2015 मध्ये मित्रांसोबत खेळताना तिने प्रथमच हॉकी स्टिक हातात घेतली होती. शालेय मैदानावर छंद म्हणून सुरू झालेला हा प्रवास आज तिला भारतीय संघापर्यंत घेऊन आला आहे.

भारतीय हॉकी संघात स्थान मिळविणारी तनुश्री ही यवतमाळ जिल्ह्यातील पहिली महिला हॉकीपटू ठरली असून, आकाश चिकटे यांच्यानंतर भारतीय संघात स्थान मिळविणारी जिल्ह्यातील दुसरी हॉकीपटू बनली आहे. तनुश्रीला कुटुंबीय प्रेमाने 'तनु' या नावाने हाक मारतात. विशेष म्हणजे ती यापूर्वी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडरही राहिली आहे. राज्याच्या तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांनी तिची निवड करून मुलींना शिक्षणासाठी प्रेरित करण्याची जबाबदारी तिच्यावर सोपविली होती.

तनुश्रीच्या यशामध्ये प्रशिक्षक सागर ठाकूर, हॉकी महाराष्ट्रचे प्रशिक्षक मनोज भोरे, हॉकी इंडियाचे उपाध्यक्ष तसेच हॉकी महाराष्ट्रचे वरिष्ठ उपाध्यक्ष, तसेच पुण्यात शिक्षण घेत असताना एसएनबीपी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. फिरोज शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 2024 मध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) मुंबई येथील राष्ट्रीय हॉकी उत्कृष्टता केंद्रात तिची निवड झाली होती. यानंतर तिच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली.

आपल्या निवडीबाबत भावना व्यक्त करताना तनुश्री म्हणाली, "यवतमाळ ते पुणे, मुंबई आणि बंगळुरूपर्यंत ज्या-ज्या प्रशिक्षकांनी आणि व्यक्तींनी मला साथ दिली, हे यश मी त्या सर्वांना समर्पित करते. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघासाठी शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करेन."

दरम्यान, तनुश्रीचे वडील दिनेश कडू यांनी सांगितले की, "तनु पाचवीपासून हॉकी खेळत आहे. लहानपणापासूनच भारतीय संघात खेळण्याचे तिचे स्वप्न होते. टेलरिंगच्या उत्पन्नावर तिच्या हॉकी किटचा आणि बाहेरगावी होणाऱ्या स्पर्धांचा खर्च करणे अत्यंत कठीण होते. मात्र तिने कधी हार मानली नाही. क्रीडा प्रबोधिनीत निवड झाल्यानंतर शासनाचेही मोठे सहकार्य मिळाले. अविनाश जोशी सर आणि शाहिद सय्यद यांनी तिला सातत्याने पाठबळ दिले. आज तिचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. तिने देशासाठी पदके जिंकून आणावीत, हीच आमची इच्छा आहे."

प्रतिस्पर्धी परिस्थितीवर मात करून भारतीय संघात स्थान मिळविणाऱ्या तनुश्री कडूची ही यशोगाथा केवळ यवतमाळसाठीच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरत आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu