महागावात ₹26,600 चा प्रतिबंधित गुटखा जप्त; आरोपी अद्याप पोलिसांच्या रडारवर
महागाव | प्रतिनिधी : शेख नूर शेख हैदर : महागाव शहरात अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने केलेल्या धडक कारवाईत काही दिवसांपूर्वी ₹26 हजार 600 किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला होता. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून आता या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सद्दाम शेख यांच्या राहत्या घरावर छापा टाकून विविध कंपन्यांच्या प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला होता. राज्यात प्रतिबंधित असलेल्या या पदार्थांची विक्री व साठवणूक केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
दरम्यान, या कारवाईला काही दिवसांचा कालावधी लोटला असला तरी संबंधित आरोपी अद्याप फरार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. आरोपीला अटक झाली आहे का, तसेच या प्रकरणात पुढे कोणती कायदेशीर पावले उचलण्यात आली आहेत, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आणि प्रश्न निर्माण झाले आहेत.
गुटखा विक्री व साठवणुकीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले असले, तरी आरोपीविरुद्धची पुढील कारवाई आणि प्रकरणाचा अंतिम निकाल काय लागतो, याकडे महागावकरांचे लक्ष लागले आहे. संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment