महाराष्ट्र बँकेच्या ATM फोडीप्रकरणी आरोपी रंगेहात अटकेत; घाटंजी पोलिसांची धडाकेबाज कारवाई
घाटंजी : घाटंजी शहरातील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम फोडीप्रकरणी घाटंजी पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीला रंगेहात पकडण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे मोठी चोरी होण्यापासून बचाव झाला असून पोलिसांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना एकूण 15 हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जून रोजी घाटंजी पोलीस स्टेशनचे कर्मचारी राहुल खंडागळे, दत्ता कुरसाम आणि सचिन नेताम हे अन्य एका गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना त्यांना सीआरओ यवतमाळकडून माहिती मिळाली की, घाटंजी येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम अज्ञात व्यक्तीने फोडले आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे पोहोचल्यानंतर एटीएम मशीनचे नुकसान झाल्याचे आढळून आले. याबाबत पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांना माहिती देण्यात आली.
यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. दरम्यान, महाराष्ट्र बँकेपासून सुमारे 50 मीटर अंतरावर असलेल्या एचडीएफसी बँकेच्या एटीएम परिसरात तपासणी सुरू असताना जवळील एका गल्लीत अंधारात एक संशयित व्यक्ती बसलेली दिसून आली. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याची ओळख विजय तानाजी महादवी (वय 30 वर्षे, रा. राजूरवाडी, ता. घाटंजी, जि. यवतमाळ) अशी पटली.
आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून एटीएम फोडण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच एटीएममधील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता आरोपी एटीएम फोडताना स्पष्टपणे दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला रंगेहात अटक केली.
घाटंजी पोलीस आणि सीआरओ यवतमाळ यांच्या समन्वयातून ही कारवाई यशस्वी ठरली असून मोठ्या आर्थिक नुकसानीपासून बँकेची सुटका झाली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घाटंजी पोलिसांचे अभिनंदन केले आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलिस कर्मचारी राहुल खंडागळे, दत्ता कुरसाम आणि सचिन नेताम यांना प्रत्येकी 5 हजार रुपये प्रमाणे एकूण 15 हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.


No comments:
Post a Comment