भररस्त्यात किराणा व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला; 55 हजारांची रोकड लुटून चोरटे पसार - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Saturday, June 6, 2026

भररस्त्यात किराणा व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला; 55 हजारांची रोकड लुटून चोरटे पसार

भररस्त्यात किराणा व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला; 55 हजारांची रोकड लुटून चोरटे पसार

वडगाव पोलिसांची तपासाला गती; काही संशयित ताब्यात


अकोला बाजार : अकोला बाजार परिसरात एका किराणा व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करून 55 हजार रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. बोरीसिंह ते रुई मार्गावरील लिंबायाच्या वाडी परिसरात चार अज्ञात चोरट्यांनी ही लूट केल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वडगाव (जंगल) पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सय्यद एजाज (रा. वाई) यांचे अकोला बाजार येथे किराणा दुकान आहे. शुक्रवारी अकोला बाजार येथे आठवडी बाजार भरत असल्याने दिवसभर मोठी व्यावसायिक उलाढाल झाली होती. रात्री व्यवसाय आटोपल्यानंतर सय्यद एजाज हे आपल्या नोकरासह मोपेडने घरी जात होते.

रात्री सुमारे साडेआठ वाजताच्या सुमारास बोरीसिंह व रुई गावादरम्यान असलेल्या लिंबायाच्या वाडी परिसरात दबा धरून बसलेल्या चार अज्ञात आरोपींनी त्यांची मोपेड अडवली. त्यानंतर आरोपींनी लोखंडी रॉडने सय्यद एजाज यांच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यात सय्यद एजाज व त्यांच्यासोबत असलेला कर्मचारी रस्त्यावर कोसळले.

हल्ल्यानंतर आरोपींनी मोपेडच्या डिकीत ठेवलेली पैशांची बॅग हिसकावून घेतली. या बॅगेत दिवसभराच्या व्यवसायातील सुमारे 55 हजार रुपयांची रोकड होती. रोकड लुटल्यानंतर आरोपी अकोला बाजारच्या दिशेने पसार झाले.

या हल्ल्यात सय्यद एजाज गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने यवतमाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच वडगाव (जंगल) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विविध पथके नियुक्त केली असून काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याचे समजते.

दरम्यान, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच वडगाव (जंगल) पोलिस ठाण्याचे ठाणेदार विकास दांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग देण्यात आला असून आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

या प्रकरणी वडगाव (जंगल) पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu