वडगाव जंगल पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दरोड्याचा गुन्हा 24 तासांत उघड
यवतमाळ : वडगाव जंगल पोलिसांनी अतिशय वेगवान आणि प्रभावी कारवाई करत व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करून 55 हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या सात आरोपींना अवघ्या 24 तासांच्या आत अटक केली आहे. आरोपींकडून लुटीची रोकड तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जून 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजता अकोला बाजार येथील व्यापारी शेखचंद इरफान मुसा यांनी आपले किराणा दुकान बंद करून दिवसाची 55 हजार रुपयांची रोकड घेऊन दोन कर्मचाऱ्यांसह दुचाकीवरून घरी निघाले होते. दरम्यान, ग्राम बोरीसिंघा शिवारात चार अज्ञात इसमांनी दोन दुचाकींवरून त्यांचा पाठलाग केला.
रात्री सुमारे 8.25 वाजता आरोपींनी व्यापाऱ्याला अडवून त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी जबरदस्तीने 55 हजार रुपयांची रोकड लुटून घटनास्थळावरून पलायन केले.
या प्रकरणी जखमी व्यापाऱ्याचे कर्मचारी सोहेल युसुफ काशेगी यांनी वडगाव जंगल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून गुन्हा क्रमांक 186/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(4), 61(2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम मुख्य आरोपी शेख मेहबूब उर्फ शेख हमेद (वय 28) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने इतर साथीदारांसह गुन्ह्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी इतर आरोपींनाही अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल गौतम कवळे (29), शुभम जानेश्वर तुरे (22), आकाश अरुण चव्हाण (22), रोहन राजू राठोड (19), शेख साजेब शेख मेहबूब (19) आणि विशाल देवराव मेघराम (25) यांचा समावेश आहे.
आरोपींकडून लुटीतील रोकड तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले असून एकूण 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करून पुढील तपास वडगाव जंगल पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बेसाने, पोलीस निरीक्षक संगीता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.


No comments:
Post a Comment