यवतमाळ औद्योगिक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; रेमंड युको डेनिम प्रकरणात व्यवस्थापनाचा अंतरिम अर्ज फेटाळला - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Saturday, May 9, 2026

यवतमाळ औद्योगिक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; रेमंड युको डेनिम प्रकरणात व्यवस्थापनाचा अंतरिम अर्ज फेटाळला

यवतमाळ औद्योगिक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; रेमंड युको डेनिम प्रकरणात व्यवस्थापनाचा अंतरिम अर्ज फेटाळला



लोक विधान/यवतमाळ : यवतमाळ औद्योगिक न्यायालयाने रेमंड युको डेनिम प्रा. लि. संदर्भातील प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय देत कंपनी व्यवस्थापनाचा अंतरिम दिलासा मागणारा अर्ज फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे कामगार संघटनांना मोठा दिलासा मिळाला आहे.




मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी व्यवस्थापनाने २१ जुलै २०२४ रोजी कामगारांनी बेकायदेशीर संप, आंदोलन व कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करत न्यायालयात तक्रार दाखल केली होती. तसेच कामगार संघटनांविरुद्ध अंतरिम स्थगिती आदेश देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने यापूर्वी काही निर्बंध घालून दिले होते, ज्यामध्ये आंदोलन, मोर्चा, घोषणाबाजी आदींवर बंदी घालण्यात आली होती.

दरम्यान, कामगार संघटनेचे वकील ॲड. वैभव एडके यांनी न्यायालयात मांडणी करताना सांगितले की, ३१ जुलै २०२४ रोजी कंपनी व नोंदणीकृत कामगार संघटनांमध्ये लेखी समझोता झाला होता. त्यानंतर कामगार शांततेत कामावर रुजू झाले असून सध्या कोणताही संप किंवा आंदोलन सुरू नाही. तसेच कंपनीविरुद्ध कोणतीही पोलिस तक्रारही दाखल नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

यावर न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, सध्याच्या परिस्थितीत कोणताही संप किंवा आंदोलन सुरू नसून कंपनीचे कामकाज सुरळीत सुरू आहे. त्यामुळे कंपनीला कोणतीही अपूरणीय हानी होण्याची शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने व्यवस्थापनाचा अंतरिम दिलासा अर्ज नामंजूर केला.

या निर्णयाचे कामगार संघटनांकडून स्वागत करण्यात आले असून हा निर्णय कामगारांच्या लोकशाही हक्कांना व सामोपचार प्रक्रियेला बळ देणारा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. तसेच प्रलंबित कामगारांच्या प्रश्नांवरही लवकरच तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu