यवतमाळ: अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर प्रशासनाचा छापा; २० सिलिंडरसह २८ हजारांचा मुद्देमाल जप्त - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Saturday, May 9, 2026

यवतमाळ: अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर प्रशासनाचा छापा; २० सिलिंडरसह २८ हजारांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ: अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर प्रशासनाचा छापा; २० सिलिंडरसह २८ हजारांचा मुद्देमाल जप्त



लोक विधान/यवतमाळ : शहरात अवैध रित्या गॅस सिलिंडरची साठवणूक आणि रिफिलिंग करणाऱ्या केंद्रावर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ९ मे २०२६ रोजी वाघापूर रोडवरील वैशाली नगर येथील 'चव्हाण गॅस शेगडी रिपेरिंग' या दुकानात बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग सुरू होते. या माहितीची खातरजमा करून तहसील कार्यालयाच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकली. या तपासणीत पथकाला ५ किलो वजनाचे १५ गॅस सिलिंडर (किंमत १८,००० रुपये) आणि १४ किलोचे ५ घरगुती गॅस सिलिंडर (किंमत १०,००० रुपये) असा एकूण २८ हजार रुपयांचा साठा अवैधरित्या साठवलेला आढळून आला. हा सर्व मुद्देमाल पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आला आहे.



या प्रकरणी आरोपी कैलास हरिसिंग चव्हाण (वय ५०, रा. वैभव नगर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. विचारपूस केली असता त्याने कोणत्याही प्रकारचे अधिकृत कागदपत्र सादर केले नाहीत. परिणामी, लोहारा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध 'अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५' च्या कलम ३ व ७ अन्वये गुन्हा (अपरध क्र. १९९/२०२६) नोंदवण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही अवैध गॅस सिलिंडरचा साठा करू नये किंवा जादा दराने विक्री करू नये; अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

सदर कारवाई जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा पुरवठा अधिकारी संघपाल मेश्राम आणि तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात निरीक्षण अधिकारी निलेश भास्कर कळसकर, सीमा दोंदल, विष्णू डोळसे आणि नरेंद्र राजपूत यांचा समावेश होता.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu