महागावात शेतकऱ्यांचा ‘हाहाकार मोर्चा’; प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Friday, May 22, 2026

महागावात शेतकऱ्यांचा ‘हाहाकार मोर्चा’; प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक

महागावात शेतकऱ्यांचा ‘हाहाकार मोर्चा’; प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक



महागाव (महागाव तालुका प्रतिनिधी शेख नूर) : तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ महागाव येथे शेतकरी, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत ‘हाहाकार मोर्चा’ काढला. ‘जन आंदोलन आधार संघर्ष समिती’च्या वतीने आयोजित या मोर्चात प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तळपत्या उन्हाची पर्वा न करता हजारो नागरिक मोर्चात सहभागी झाल्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.



पिक विमा, अवैध दारू विक्री, खतांचा काळाबाजार, पांदण रस्त्यांची दुरवस्था, घरकुल योजनेतील अडचणी आदी विविध मागण्यांसाठी समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीशभाऊ नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. यावेळी शेतकरी आणि महिलांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

मोर्चादरम्यान जगदीशभाऊ नरवाडे यांनी प्रशासनावर घणाघाती टीका करत महागाव तालुक्यावर सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप केला. “प्रशासन कुंभकर्णी झोपेत असून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे,” असा संतप्त आरोप त्यांनी आपल्या भाषणातून केला.



आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या निषेधार्थ पोस्टर गळ्यात अडकवून प्रशासनाचा निषेध नोंदवला. विशेष म्हणजे या मोर्चात महिला भगिनींचा मोठा सहभाग दिसून आला. तप्त उन्हातही महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला.

मोर्चाद्वारे प्रशासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या. त्यामध्ये तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीने आणि सरसकट पीक विमा मंजूर करावा, बाजारात विक्री होत असलेल्या बोगस खत, बियाणे आणि औषधांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ महिलांना विनाअडथळा मिळावा, तालुक्यात ‘गाव तिथे दारूबंदी’ लागू करावी, घरकुल योजनेतील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, पांदण रस्त्यांची तातडीने निर्मिती करावी तसेच कलगाव येथील स्मशानभूमीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश होता.

यावेळी तहसीलदार गजानन पराते, गटविकास अधिकारी दत्तात्रय कदम, पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड आणि तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले यांनी संबंधित विभागांची निवेदने स्वीकारली.

या आंदोलनात जगदीश नरवाडे, नागोराव पाटील कदम, गोविंदराव देशमुख, संजय गरुड, मंगेश पाटील वानखेडे, स्वप्निल नरवाडे, आकाश चव्हाण, अमोल चंदापुरे, अमोल वानखेडे, ओम कुसुंगवार, बापूराव देशमुख, दिलीप सुरोशे, केदार जोशी, दादाराव ठाकरे, दिगंबर गाडबैले यांच्यासह सुवर्णा देशमुख, देवकाबाई राठोड, मेहजबिन पठाण आणि तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दरम्यान, प्रशासनाने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही जाहीर सभेतून देण्यात आला. या ‘हाहाकार मोर्चा’मुळे प्रशासनाचे धाबे दणाणल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu