जिल्ह्यात खाजगी ट्रॅव्हल्सची 'जीवघेणी' अवैध वाहतूक; आरटीओच्या भ्रष्ट कारभाराविरोधात मंत्रालयात धडक - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Sunday, May 3, 2026

जिल्ह्यात खाजगी ट्रॅव्हल्सची 'जीवघेणी' अवैध वाहतूक; आरटीओच्या भ्रष्ट कारभाराविरोधात मंत्रालयात धडक

जिल्ह्यात खाजगी ट्रॅव्हल्सची 'जीवघेणी' अवैध वाहतूक; आरटीओच्या भ्रष्ट कारभाराविरोधात मंत्रालयात धडक


लोक विधान/यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात नियमबाह्य पद्धतीने चालणारी खाजगी ट्रॅव्हल्सची अवैध वाहतूक आणि याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणाऱ्या आरटीओ (RTO) विभागाच्या कारभाराविरोधात आता थेट मंत्रालयातून दाद मागण्यात आली आहे. लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे जिल्हा कार्याध्यक्ष मनिष शिरभाते यांनी मुंबई येथे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन या गंभीर परिस्थितीबाबत निवेदन सादर केले आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.



निवेदनात नमूद केल्यानुसार, यवतमाळ जिल्ह्यात खाजगी बसेस आणि ट्रॅव्हल्स चालकांकडून 'टप्पा वाहतूक' नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे आणि बसेसमध्ये नियमाबाह्य तांत्रिक बदल करणे यामुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या संदर्भात मनिष शिरभाते यांनी आरटीओ विभागावर खळबळजनक आरोप केला असून, आरटीओ अधिकारी आणि कर्मचारी या अवैध प्रकारावर कारवाई करण्याऐवजी दलालांमार्फत वसुली करण्यात मग्न असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.आरटीओच्या नाक्यांवर उघडपणे होणाऱ्या या आर्थिक व्यवहारामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.



पुसद - मुंबई मार्गावरील 'बंजारा' ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघाताचा संदर्भ देत शिरभाते यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवले जात असल्यामुळेच निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत असून, या जीवघेण्या प्रकाराला वेळीच लगाम न घातल्यास भविष्यात मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि भ्रष्ट साखळी तोडण्यासाठी ही लढाई मंत्रालयापर्यंत नेली असल्याचे सांगत, शिरभाते यांनी परिवहन मंत्र्यांकडे काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कठोर गुन्हे दाखल करणे, आरटीओ विभागातील भ्रष्ट अधिकारी आणि वसुली करणाऱ्या दलालांची सखोल चौकशी करून त्यांचे निलंबन करणे, तसेच प्रत्येक खाजगी ट्रॅव्हल्सची तांत्रिक तपासणी अनिवार्य करणे या बाबींचा समावेश आहे. या निवेदनामुळे आता आरटीओ विभाग आणि अवैध ट्रॅव्हल्स चालकांच्या गोटात खळबळ उडाली असून, राज्य शासन यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu