रीलच्या नादात हरवलेली पिढी - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Friday, May 29, 2026

रीलच्या नादात हरवलेली पिढी

रीलच्या नादात हरवलेली पिढी

लेखक – डॉ. सतीश लक्ष्मणराव कोडापे

(वैद्यकीय अधिकारी, मा. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ)



आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात सोशल मीडियाने मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईल आणि इंटरनेटमुळे जग अगदी जवळ आले असले, तरी या आभासी दुनियेच्या मोहात आजची तरुण पिढी वास्तवापासून दूर जात असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे. विशेषतः “रील” बनवण्याच्या वाढत्या आकर्षणाने युवक-युवतींच्या विचारसरणीवर आणि जीवनशैलीवर मोठा परिणाम होत आहे.

पूर्वीची तरुणाई अभ्यास, क्रीडा, सामाजिक कार्य आणि स्वतःच्या करिअरकडे अधिक लक्ष देत असे. आज मात्र अनेक तरुणांचा मोठा वेळ मोबाईल स्क्रीनसमोर खर्च होत आहे. काही सेकंदांच्या प्रसिद्धीसाठी धोकादायक स्टंट, सार्वजनिक ठिकाणी विचित्र कृत्ये, अश्लील हावभाव आणि दिखाऊपणाला प्रोत्साहन दिले जात आहे. लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या स्पर्धेत स्वतःचे व्यक्तिमत्त्व आणि उद्दिष्ट हरवत चालल्याचे दिसते.

रस्ते, रेल्वे ट्रॅक, शाळा-कॉलेज परिसर, धार्मिक स्थळे अशा संवेदनशील ठिकाणी रील शूट करण्याचे प्रकार वाढले आहेत. या बेफिकीर कृत्यांमुळे अनेक अपघात घडत असून काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. समाजातील लहान मुले आणि किशोरवयीन मुलांवरही याचा विपरीत परिणाम होत आहे. सोशल मीडियावर दिसणाऱ्या गोष्टींचे अंधानुकरण करण्याची प्रवृत्ती वाढत आहे.

ही समस्या केवळ तरुणांपुरती मर्यादित राहिलेली नाही. महिलांपासून लहान मुलांपर्यंत अनेक जण या आभासी प्रसिद्धीच्या मोहात अडकताना दिसत आहेत. परिणामी कौटुंबिक संवाद कमी होत असून नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. काही वेळा प्रसिद्धीसाठी समाजाच्या मर्यादाही ओलांडल्या जात आहेत.

सोशल मीडियाचा योग्य वापर काळाची गरज असली, तरी त्याचे व्यसन अत्यंत घातक ठरू शकते. पालकांनी मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. शाळा आणि महाविद्यालयांनी डिजिटल साक्षरतेसोबत नैतिक शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी यावरही भर देण्याची गरज आहे.

आजच्या तरुणांनी स्वतःला एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.आपण रीलसाठी जगतोय का, की आपल्या भविष्याकरिता?कारण काही क्षणांची प्रसिद्धी आयुष्य घडवत नाही; तर योग्य दिशा, मेहनत, संस्कार आणि वास्तवातील कर्तृत्वच उज्ज्वल भविष्य घडवते.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu