यवतमाळात भेसळ माफियांचा हैदोस; ‘मुंडे पॅटर्न’ची धडक कारवाई कधी? - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Friday, May 29, 2026

यवतमाळात भेसळ माफियांचा हैदोस; ‘मुंडे पॅटर्न’ची धडक कारवाई कधी?

यवतमाळात भेसळ माफियांचा हैदोस; ‘मुंडे पॅटर्न’ची धडक कारवाई कधी?

निकृष्ट अन्नपदार्थांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


यवतमाळ : राज्यभरात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू असताना यवतमाळ जिल्ह्यात मात्र भेसळ माफियांचे जाळे दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असल्याचे चित्र आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुणे, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणात कारवाई करून भेसळखोरांचे धाबे दणाणले. मात्र यवतमाळ जिल्ह्यात अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात दूध, तूप, पनीर, मसाले, मिठाई, खाद्यतेल आणि फळांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. बाजारपेठांमध्ये रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार केलेले निकृष्ट पदार्थ खुलेआम विकले जात असून, ग्राहकांच्या जीवाशी सर्रास खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे. तरीही संबंधित यंत्रणा केवळ दिखाऊ तपासण्या करत असल्याने भेसळखोरांचे फावले आहे.

विशेष म्हणजे काही हॉटेल्स, फास्ट फूड सेंटर आणि कॅन्टीनमध्ये ‘चीज’च्या नावाखाली बनावट व निकृष्ट दर्जाचे पदार्थ वापरले जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. ग्राहकांची उघडपणे फसवणूक होत असताना संबंधित विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका होत आहे.

फळे लवकर पिकवण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. रासायनिक फळे व भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे भविष्यात मोठ्या आरोग्य संकटाला सामोरे जावे लागू शकते, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी जिल्ह्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखू तस्करीची अनेक प्रकरणे उघडकीस आली होती. पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, मात्र या काळ्या व्यवसायामागील मोठे मास्टरमाईंड अजूनही मोकाट असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे “कारवाई फक्त छोट्या विक्रेत्यांपुरतीच मर्यादित राहणार का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

राज्यात सुरू असलेल्या ‘मुंडे पॅटर्न’प्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर धाडसत्र राबवून भेसळ माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu