नाथजलच्या नावाखाली प्रवाशांची लूट; यवतमाळ आगारात १५ रुपयांची बाटली २० रुपयांना विक्री
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नाथजल’ या बाटलीबंद पाण्याच्या विक्रीत यवतमाळ आगारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचे समोर आले आहे. अधिकृतपणे १ लिटर ‘नाथजल’ पाण्याच्या बाटलीची किंमत १५ रुपये असताना, अनेक विक्रेते प्रवाशांकडून २० रुपये आकारत असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे थंड पाण्याची गरज वाढली असून, अनेक प्रवासी नाईलाजास्तव जादा पैसे देऊन बाटल्या खरेदी करत आहेत. काही जागरूक प्रवाशांनी बाटलीवरील छापील दराबाबत विचारणा केली असता, “थंड पाण्यासाठी अतिरिक्त पैसे घ्यावे लागतात,” अशी उत्तरे विक्रेत्यांकडून दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्य शासन व परिवहन विभागाच्या स्पष्ट निर्देशानुसार ‘नाथजल’ पाण्याची बाटली निर्धारित दरानेच विकणे बंधनकारक आहे. तरीदेखील यवतमाळ आगार परिसरात काही विक्रेते नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी इतर कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्याही अधिक दराने विकल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत.
एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी ‘नाथजल’ सेवा सुरू केली असली, तरी काही विक्रेत्यांकडून या सेवेचा गैरफायदा घेतला जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढत आहे. आगार प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करावी, तसेच जादा दराने पाणी विक्री तात्काळ बंद करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून होत आहे.

No comments:
Post a Comment