ईदुल-अजहा (कुर्बानी)चे आर्थिक आणि सामाजिक पैलू
सैय्यद सलमान, पुसद
भारतात “बकराईद” म्हणून ओळखला जाणारा ईदुल-अजहा हा इस्लाम धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. हा सण केवळ धार्मिक विधी किंवा प्राण्यांच्या कुर्बानीपुरता मर्यादित नसून त्यामागे त्याग, समर्पण, सामाजिक न्याय, आर्थिक समता आणि मानवतेचा गाढ संदेश दडलेला आहे. प्रेषित हजरत इब्राहीम (अलै.) आणि त्यांचे सुपुत्र हजरत इस्माईल (अलै.) यांनी अल्लाहच्या आदेशाप्रती दाखविलेल्या पूर्ण निष्ठा, आज्ञाधारकता आणि बलिदानाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे ईदुल-अजहा हा केवळ धार्मिक उत्सव नसून मानवाला त्याग, संयम आणि समाजहिताचे शिक्षण देणारा प्रेरणादायी सण आहे.
कुर्बानी म्हणजे फक्त एखाद्या जनावराची आहुती नव्हे, तर स्वतःमधील अहंकार, स्वार्थ, लोभ, अन्याय आणि द्वेष यांसारख्या दुर्गुणांचा त्याग करण्याची शिकवण होय. म्हणूनच ईदुल-अजहा हा सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक समतोल निर्माण करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जातो. इस्लाममध्ये कुर्बानी ही अल्लाहप्रती निष्ठा, समर्पण आणि तक्वा (ईशभय) यांचे प्रतीक मानली जाते. पवित्र कुरआनमध्ये म्हटले आहे, “अल्लाहपर्यंत त्यांच्या मांसाचा किंवा रक्ताचा पोहोच होत नाही, तर तुमचा तक्वा पोहोचतो.” (सुरह अल-हज्ज : 37) या आयतीतून स्पष्ट होते की इस्लाममध्ये कुर्बानीचा उद्देश दिखावा किंवा बाह्य स्वरूप नसून अंतःकरणातील पवित्रता, श्रद्धा आणि मानवतेची भावना आहे.
ईदुल-अजहाच्या वेळी कुर्बानीचे मांस तीन भागांत वाटण्याची परंपरा आहे. एक भाग स्वतःसाठी, दुसरा नातेवाईकांसाठी आणि तिसरा गरीब व गरजूंना दिला जातो. या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पौष्टिक अन्न पोहोचते. अनेक गरीब कुटुंबांना वर्षातून एकदाच मांस खाण्याची संधी मिळते. त्यामुळे कुर्बानी ही सामाजिक अन्नवाटपाची आणि आर्थिक समतेची प्रभावी व्यवस्था ठरते.
कुर्बानीमुळे पशुपालन क्षेत्रालाही मोठा आर्थिक आधार मिळतो. ग्रामीण भागातील हजारो शेतकरी आणि पशुपालक वर्षभर बकऱ्या व इतर जनावरे वाढवतात आणि ईदुल-अजहाच्या काळात त्यांची विक्री करतात. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते, बेरोजगारांना रोजगार मिळतो तसेच पशुखाद्य, वाहतूक, बाजारपेठ आणि पशुवैद्यकीय सेवांना चालना मिळते. भारतासारख्या कृषिप्रधान देशात हा सण ग्रामीण अर्थचक्राला गती देणारा ठरतो.
ईदुल-अजहाच्या निमित्ताने अनेक छोटे व्यवसाय आणि लघुउद्योग सक्रिय होतात. दोरी, चारा, जनावरांच्या सजावटीचे साहित्य, वाहतूक व्यवसाय, कपडे आणि किरकोळ बाजार यांना या काळात विशेष मागणी असते. विशेषतः चामड्याच्या उद्योगाला मोठ्या प्रमाणात कच्चा माल उपलब्ध होतो. त्यामुळे हजारो कामगारांना रोजगाराच्या संधी निर्माण होतात. कुर्बानी ही संपत्तीच्या पुनर्वाटपाचेही प्रभावी माध्यम आहे. समाजातील सक्षम आणि श्रीमंत व्यक्ती आपल्या संपत्तीचा काही भाग अल्लाहच्या मार्गात खर्च करतात आणि त्याचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचतो. यामुळे आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होते आणि सहजीवनाची भावना वाढीस लागते.
कुर्बानीमुळे समाजात प्रेम, बंधुभाव आणि परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत होते. श्रीमंत-गरीब, नातेवाईक-शेजारी सर्वजण आनंद वाटून घेतात. मटण वाटपाच्या माध्यमातून सामाजिक संबंध अधिक दृढ होतात आणि समाजातील दुर्लक्षित घटकांनाही सणाच्या आनंदात सहभागी होता येते. ईदुल-अजहा माणसाला त्याग, संयम आणि समर्पण शिकवते. हजरत इब्राहीम (अलै.) यांनी स्वतःच्या अत्यंत प्रिय पुत्रालाही अल्लाहच्या आदेशासाठी अर्पण करण्याची तयारी दाखवली. आजच्या भौतिकवादी युगात हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. मनुष्याने स्वतःच्या स्वार्थावर नियंत्रण ठेवून समाजहिताचा विचार करणे आवश्यक आहे.
कुर्बानीची भावना केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित नाही, तर ती समाजातील दुर्बल घटकांप्रती संवेदनशीलता निर्माण करते. जर कुर्बानीच्या माध्यमातून भुकेल्याला अन्न, गरीबाला मदत, अनाथाला आधार आणि गरजूंना सहकार्य मिळाले, तर समाज अधिक न्याय्य, संवेदनशील आणि मानवी मूल्यांवर आधारित बनू शकतो. इस्लाममध्ये कुटुंबव्यवस्थेलाही अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. बीबी हाजरा यांच्या त्यागातून स्त्रीची सहनशीलता, विश्वास आणि कुटुंब घडविण्यातील महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट होते. एक सुसंस्कृत कुटुंबच समाजाला चांगले नागरिक देते. त्यामुळे महिलांचे नैतिक, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान समाजनिर्मितीसाठी अत्यावश्यक आहे.
कुर्बानी करताना स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, सामाजिक जबाबदारी आणि गरजूंना प्राधान्य या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. म्हणून ईदुल-अजहा हा केवळ धार्मिक उत्सव नसून त्याग, सामाजिक न्याय, आर्थिक समता आणि मानवतेचा संदेश देणारा महान सण आहे. कुर्बानीचे खरे तत्त्व म्हणजे अल्लाहप्रती निष्ठा, गरीबांविषयी करुणा आणि समाजासाठी समर्पण होय. जर कुर्बानीची भावना आपल्या दैनंदिन जीवनात उतरली, तर समाजात आर्थिक समतोल, सामाजिक ऐक्य, नैतिकता आणि मानवतेचा विकास होईल. त्यामुळे कुर्बानीसोबतच आपण आपल्या मनातील स्वार्थ, अन्याय, अहंकार आणि द्वेष यांसारख्या दुर्गुणांचीही कुर्बानी करून त्याग आणि समर्पणाचा हा सण सर्वांनी मिळून साजरा करणे हीच खरी ईदुल-अजहाची शिकवण आहे.

No comments:
Post a Comment