अतिक्रमण कारवाईत दुजाभाव थांबवा; गोरगरीब हातगाडी व्यवसायिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप
यवतमाळ हॉकर्स असोसिएशनची प्रशासनाकडे मागणी
यवतमाळ शहरात नगरपरिषदेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात यवतमाळ हॉकर्स असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहराचा विकास व्हावा, रस्ते मोकळे राहावेत आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये याला आमचा कोणताही विरोध नसल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले. मात्र, ही कारवाई निवडक पद्धतीने होत असून गोरगरीब हातगाडी व फेरीवाला व्यवसायिकांनाच लक्ष्य केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, शहरातील अनेक ठिकाणी छोट्या हातगाड्या, ढकलगाड्या आणि रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्या गरीब विक्रेत्यांची दुकाने हटवली जात आहेत. अनेकांचे साहित्य जप्त करण्यात येत असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधनच हिरावले जात आहे. दुसरीकडे, प्रभावशाली व्यक्ती, पैसेवाले व्यापारी आणि राजकीय पाठबळ असलेल्या लोकांनी केलेल्या पक्क्या अतिक्रमणांकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“गरिबांसाठी एक नियम आणि श्रीमंतांसाठी दुसरा नियम असा दुजाभाव का?” असा सवाल यवतमाळ हॉकर्स असोसिएशनने उपस्थित केला आहे. सध्याच्या महागाईच्या काळात हातावर पोट असलेल्या अनेक कुटुंबांचा व्यवसाय अतिक्रमण मोहिमेच्या नावाखाली उद्ध्वस्त होत असल्याने त्यांच्यासमोर उपासमारीची वेळ येत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
यवतमाळ हॉकर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरज खोब्रागडे यांनी सांगितले की, “जर नगरपरिषद गोरगरीबांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नसेल, तर त्यांचा चालू रोजगार अतिक्रमणाच्या नावाखाली का हिरावून घेत आहे?” तसेच, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नगरपरिषद, प्रशासन आणि हॉकर्स प्रतिनिधींना सहभागी करून ‘टाउन कमिटी’ स्थापन करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, प्रशासनाने अन्यायकारक आणि निवडक कारवाया थांबवून सर्वांना समान न्याय द्यावा, अन्यथा यवतमाळ हॉकर्स असोसिएशनकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही संघटनेतर्फे देण्यात आला आहे.



No comments:
Post a Comment