जावेद भैय्या काझी यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश
रुई येथील ब्रेन ट्यूमरग्रस्त वैशाली मोहळे हिला कॅन्सर प्रमाणपत्र व निराधार पेन्शन मंजूर
यवतमाळ जिल्ह्यातील रुई येथील ब्रेन ट्यूमरग्रस्त युवती वैशाली विनोद मोहळे हिला अखेर कॅन्सर प्रमाणपत्र मंजूर झाले असून, दुर्धर आजाराच्या आधारे निराधार पेन्शनचा मार्गही मोकळा झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते जावेद भैय्या काझी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वैशाली मोहळे ही अवघ्या 19 वर्षांची असून ती अनेक वर्षांपासून ब्रेन ट्यूमर कॅन्सरशी झुंज देत आहे. तिचे वडील नसून आईच्या आधारावरच घर चालते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने उपचारासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. अशा परिस्थितीत जावेद भैय्या काझी यांनी पुढाकार घेत वैशालीच्या उपचारासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले.
जावेद भैय्या काझी यांच्या प्रयत्नातून नागपूर येथील एम्स रुग्णालयात वैशालीवर टप्प्याटप्प्याने तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सध्या तिची प्रकृती पूर्वीपेक्षा सुधारलेली असली तरी औषधोपचार सुरूच आहेत. पुढील उपचारांसाठी आर्थिक मदतीची नितांत गरज असल्याने काझी यांनी विविध शासकीय कार्यालयांमध्ये सतत पाठपुरावा केला.
दरम्यान, वैशालीला जीएमसी शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी दाखवण्यात आले. न्युरोसर्जन डॉ. चेतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी तिची तपासणी करण्यात आली. आवश्यक वैद्यकीय कागदपत्रे, अहवाल आणि तपासणी प्रक्रिया पूर्ण करून जावेद भैय्या काझी यांनी संबंधित विभागांकडे पाठपुरावा सुरू ठेवला.
अखेर काल दिवसभर विविध कार्यालयांमध्ये धावपळ करून वैशालीचे सर्व वैद्यकीय अहवाल आणि कागदपत्रे सीएस कार्यालयात सादर करण्यात आली. सीएस सुधाकर राठोड यांनी प्रकरणाची पाहणी करून वैशाली मोहळे हिला कॅन्सर प्रमाणपत्र मंजूर केले.
या प्रमाणपत्राच्या आधारे आता तहसील कार्यालयामार्फत दुर्धर आजार योजनेअंतर्गत तिला निराधार पेन्शन मिळणार आहे. या आर्थिक मदतीमुळे वैशालीच्या औषधोपचारासाठी मोठा आधार मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
जावेद भैय्या काझी यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे आणि गरजू कुटुंबासाठी घेतलेल्या मेहनतीमुळे परिसरात त्यांचे कौतुक होत असून, अनेकांनी त्यांच्या कार्याला सलाम केला आहे.


No comments:
Post a Comment