तहानलेल्यांसाठी ढळे बंधूंची ‘जलसेवा’; वर्षभर मोफत पाणी पाजून जपली माणुसकी
लोक विधान / यवतमाळ : आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी युगात पाणीही बाटलीबंद होऊन विकले जात असताना, यवतमाळ शहरातील ढळे बंधूंनी माणुसकीचा अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. गोवर्धन जानरावजी ढळे आणि राहुल ढळे हे आपल्या पान टपरीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून तहानलेल्या नागरिकांना बाराही महिने मोफत शुद्ध पाणी उपलब्ध करून देत आहेत. ‘जल ही जीवन है’ हा संदेश त्यांनी केवळ शब्दांत नव्हे, तर कृतीतून जिवंत ठेवला आहे.
यवतमाळच्या बस स्थानकासमोर नागपूर रोडवरील गजबजलेल्या परिसरात ढळे बंधूंचे पान दुकान असून, उन्हाळा असो वा पावसाळा त्यांच्या दुकानासमोर पाणी पिणाऱ्यांची कायम गर्दी दिसून येते. विशेष म्हणजे, दररोज तब्बल ६० ते ७० बॅरल पाण्याची आवश्यकता भासते. शहरात अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवत असताना आणि पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर येत असताना, ढळे बंधू स्वतः खर्च करून पाणी विकत घेतात आणि ते नागरिकांना पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देतात.
आज अनेक ठिकाणी पाण्याचा व्यवसाय करून नफा कमावला जात असताना, ढळे बंधूंचा दृष्टिकोन मात्र पूर्णपणे सेवाभावी आहे. “आमच्या दुकानातून कोणताही तहानलेला व्यक्ती विनापाणी परत जाऊ नये, हीच आमची इच्छा आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. “कधीतरी तहानलेल्या व्यक्तीला पाणी पाजून पहा, त्यातून मिळणारे समाधान कोणत्याही नफ्यापेक्षा मोठे असते,” हा त्यांचा प्रेरणादायी विचार अनेकांसाठी आदर्श ठरत आहे.
ढळे बंधूंच्या या उपक्रमाचे यवतमाळ शहरासह परिसरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. स्वार्थाच्या जगात निस्वार्थ भावनेने सुरू असलेल्या या ‘जलसेवे’मुळे माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा सकारात्मक संदेश समाजात पोहोचत आहे.

No comments:
Post a Comment