पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीचे आश्वासन; यवतमाळकरांना पुन्हा ‘गाजर’? - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Monday, May 11, 2026

पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीचे आश्वासन; यवतमाळकरांना पुन्हा ‘गाजर’?

पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीचे आश्वासन; यवतमाळकरांना पुन्हा ‘गाजर’?



लोक विधान/यवतमाळ : यवतमाळ शहरातील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे “पाहणी” आणि “आश्वासन” यापुरतेच मर्यादित राहिल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. शहरातील हिंदी हायस्कूल ते वीर वामनराव चौक ते आयुर्वेदिक कॉलेज चौक, तिवारी चौक ते सारस्वत चौक ते संकटमोचन, बाजोरिया नगर ते विदर्भ हाऊसिंग सोसायटी ते भोसा रोड, तहसिलदार क्वार्टर ते चिमणलाल देसाई चापमनवाडी रस्ता, आरटीओ ऑफिस ते नागपूर बायपास रोड तसेच कळंब चौक ते स्टेट बँक चौक ते वंजारी फैल या प्रमुख मार्गांची अवस्था अक्षरशः दयनीय झाली आहे.



मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि धुळीचे साम्राज्य यामुळे नागरिकांचे रोजचे जगणे त्रासदायक झाले आहे. वाहनचालकांचे अपघात, दुचाकीस्वारांची पडझड आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असताना प्रशासनाला आता जाग आली आहे का, असा सवाल नागरिक विचारत आहेत.



माहिती अधिकार कार्यकर्ता दिगंबर पजगाळे आणि यवतमाळ नगर परिषदेचे नगर अभियंता श्री. गवळी यांनी आज सकाळी आठ वाजता या सर्व रस्त्यांची पाहणी केली. पाहणीनंतर “पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्यात येतील”, “मोठे खड्डे बुजवले जातील” अशी आश्वासने देण्यात आली. मात्र यवतमाळकरांसाठी ही आश्वासने काही नवीन नाहीत. दरवर्षी पावसाळ्याआधी रस्ते दुरुस्तीच्या घोषणा होतात, लाखो रुपयांची कामे कागदावर मंजूर होतात; पण प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था ‘जैसे थे’च राहते.



प्रश्न असा आहे की, शहरातील रस्ते एवढे खराब होईपर्यंत प्रशासन झोपले होते का? नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कामे का झाली नाहीत? आणि आता पावसाळा तोंडावर असताना घाईघाईने होणारी दुरुस्ती किती टिकणार, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.

यवतमाळकरांना आता केवळ पाहणी नको, तर दर्जेदार आणि टिकाऊ रस्ते हवे आहेत. अन्यथा “पाहणी” आणि “आश्वासन” या शब्दांवर जनतेचा विश्वास पूर्णपणे उडण्यास वेळ लागणार नाही. आता बघायचे एवढेच — प्रशासन खड्डे बुजवणार की पुन्हा नागरिकांच्या डोळ्यांत धूळफेक करणार?

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu