यवतमाळ जिल्ह्यातील दैनिक क्राईम वर आधारित पोलीस डायरी
१. यवतमाळ शहरात घरफोडी; ७४ हजारांचा मुद्देमाल लंपास
यवतमाळ : यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या स्वप्निल नगर परिसरात एक मोठी घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. फिर्यादी निलेश पुरुषोत्तम वाहितकर (वय ४५) हे घरात नसताना, अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने कपाटातील ४४,००० रुपये किमतीची १० ग्रॅम सोन्याची चैन, ३०,००० रुपये रोख आणि काही महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण ७४,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. ही घटना २५ ते २९ एप्रिलच्या दरम्यान घडली असून अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
२. लग्नातील गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची पोत लंपास
दारव्हा :दारव्हा येथील शिवलॉन परिसरात एका लग्नसमारंभादरम्यान चोरीची घटना घडली आहे. फिर्यादी सौ. श्रद्धा शरद गरूड (वय ५७) या लग्नासाठी गेल्या असता, गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ३७,५०० रुपये किमतीची साडेआठ ग्रॅम सोन्याची अष्टकोनी मण्यांची पोत शिताफीने चोरून नेली. ही घटना २९ एप्रिल रोजी दुपारी घडली. याप्रकरणी दारव्हा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
३. पुसदमध्ये जमिनीच्या वादातून तरुणावर दगडाने हल्ला
पुसद : पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लाखी गावात जमिनीच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. अमर रामदास डुमरे (वय २७) हे शेतात पाणी भरत असताना, आरोपी ओम हरिदास डुमरे आणि त्याच्या एका साथीदाराने त्यांना "तू आमच्या बाजूला कशाला येतो?" असे विचारले. अमर यांनी "माझेही शेत जवळच आहे" असे उत्तर दिले असता, रागाच्या भरात आरोपींनी जमिनीवरील दगड उचलून अमर यांच्या डाव्या डोळ्यावर व कपाळावर मारला. यात अमर गंभीर जखमी झाले असून आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
४. उमरखेडमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीला
उमरखेड :उमरखेड तालुक्यातील खरूस गावात घरफोडीची आणखी एक घटना घडली आहे. सौ. सुनंदा पांडुरंग नरवाडे (वय ५५) यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने कपाटात ठेवलेले ७ ग्रॅम सोन्याचे झुंबर, ५ ग्रॅमची सोन्याची पोत आणि १०,००० रुपये रोख असा एकूण ५०,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना २८ एप्रिल रोजी दुपारी घडली. उमरखेड पोलिसांनी या चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

No comments:
Post a Comment