रावेर हत्याकांडाचा ऐतिहासिक तपास; यवतमाळ पोलिस अधीक्षक कुमार चिंतांना महासंचालकांकडून गौरव
यवतमाळ : रावेर येथील शेतातील घरात चार अल्पवयीन भावंडांची निर्घृण हत्या करून एका मुलीवर अत्याचार केल्याच्या अत्यंत संवेदनशील आणि खळबळजनक प्रकरणाचा तपास अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने पूर्ण केल्याबद्दल यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंत्ता (भा.पो.से.) यांना महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते (भा.पो.से.) यांच्या हस्ते उत्कृष्ट दोषसिद्धी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
रावेर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या प्रकरणात शेख मुस्तफा शेख यासीन हे नातेवाईकांकडील कार्यक्रमासाठी गेले असताना त्यांच्या शेतातील घरात असलेल्या दोन मुलांसह दोन मुलींची हत्या करण्यात आली होती. या चारही अल्पवयीन मुलांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यापैकी एका अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार (बलात्कार) केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
घटनेनंतर रावेर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ३४८/२०२०, कलम ३०२ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी आरोपीचा थेट पुरावा उपलब्ध नसल्याने तपास पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. आरोपीने कोणताही ठोस पुरावा मागे न ठेवता गुन्हा केल्याने तपास यंत्रणेसमोर आरोपीपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.
या परिस्थितीत तपास पथकाने पारंपरिक तपास कौशल्यासोबतच वैज्ञानिक पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे, तांत्रिक तपास आणि उपलब्ध साक्षी-पुराव्यांची शास्त्रोक्त सांगड घातली. तपासादरम्यान आरोपीचा शोध घेताना कोणताही थेट पुरावा उपलब्ध नसतानाही पोलिसांनी ‘लास्ट सीन थिअरी’ (Last Seen Theory) च्या आधारे तपास पुढे नेला.
तपासाअंती महेंद्र सीताराम बारेेला, रा. खस्तीक टॉकीजजवळ, बृहाणपूर रोड, रावेर, ता. भुसावळ, जि. जळगाव याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. प्रकरणाची सुनावणी भुसावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालय व विशेष न्यायालयात झाली.
न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान तपास अधिकारी तथा तत्कालीन परिविक्षाधीन अधिकारी कुमार चिंत्ता यांनी केलेल्या उत्कृष्ट तपासाची दखल घेण्यात आली. दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेनंतर ४ जून २०२६ रोजी न्यायालयाने या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल देत आरोपी महेंद्र सीताराम बारेेला याला फाशीची शिक्षा सुनावली. चार निष्पाप बालकांच्या सामूहिक हत्याकांडाला अत्यंत क्रूर स्वरूपाचा गुन्हा मानून न्यायालयाने हा प्रकार ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ (Rarest of Rare Case) श्रेणीत मोडणारा असल्याचे नमूद केले. तसेच संबंधित अत्याचाराच्या कलमांखालीही कठोर शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणातील तपास हा महाराष्ट्र पोलिस दलासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे पोलीस विभागाने म्हटले आहे. अत्यंत संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी पुरावे उपलब्ध नसतानाही वैज्ञानिक तपास, परिस्थितीजन्य पुरावे, तांत्रिक तपास आणि पुराव्यांची शास्त्रोक्त मांडणी यामुळे आरोपीविरुद्ध दोषसिद्धी होऊ शकली.
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते २१ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कुमार चिंत्ता यांना उत्कृष्ट दोषसिद्धीचे प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. हा सन्मान त्यांच्या उत्कृष्ट तपासकौशल्याची आणि व्यावसायिक कार्यक्षमतेची पावती असून, महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांसाठी तो निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.


No comments:
Post a Comment